---Advertisement---
सर्वाधिक सुरक्षित प्रवास एसटी महामंडळाच्या बसेसचा समजला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांत एसटी बसेसचे १०,२४३ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १,२६६ जणांचा मृत्यू झाला, तर १४,१५३ जण जखमी झाले. मानवी चुका आणि तांत्रिक कारणांमुळे अपघातांची संख्या वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील गुळगुळीत महामार्ग आणि राज्यमार्गावरून वाहने भरधाव चालविण्यात येतात. त्यात खाजगी बसेसह एसटी महामंडळाच्या बसेसचाही समावेश आहे. कमी वेळेत पोहोचता यावे यासाठी खाजगी बसेसना प्रवासी प्राधान्य देतात. मात्र, सुरक्षित प्रवासासाठी महिला, वृद्धांसह विद्यार्थी आजही एसटी बसेसचा उपयोग करतात.
एसटी विभागात भंगार गाड्यांची संख्या वाढली होती. त्यामुळेही बसेसचे अपघात वाढल्याचे चित्र होते. गेल्या तीन वर्षांत रस्त्यांवर धावत असताना तांत्रिक बिघाड आल्याने १,९७,९९६ वेळा बसेस बंद पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. २०२३-२४ मध्ये सर्वाधिक ६७ हजार घटना बसेस बिघडण्याच्या झाल्याची नोंद आहे.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत गेल्या तीन वर्षांत राज्य महामंडळाने एसटीच्या ताफ्यात २,२१५ नव्या बसेस दाखल केल्या आहेत. त्यात ३७९ बसेच वातानुकूलित आहेत. गेल्या वर्षीपासून प्रत्येक बसचालकाच्या आरोग्य तपासणीसह हायटेक प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे. असे असतानाही एसटी बसेसच्या अपघाताच्या संख्येत घट होताना दिसत नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना प्राप्त आकडेवारीनुसार, २०२४ या वर्षात बसेसचे सर्वाधिक ३.५६३ अपघात झाले आहेत. या कालावधीत सर्वाधिक ४७० मृत्यू झाल्याची नोंद आहे. ‘लाडक्या बहिणी’ मुळे एसटीला संजीवनी राज्य महामंडळाने २०२३ पासून महिला सन्मान योजना सुरू केली. या योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली. गेल्या तीन वर्षांत ७५ कोटी २३ लाख महिलांनी एसटी बसेसमधून प्रवास केला. महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत देऊनही महिला सन्मान योजनेतून ४,४७१ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात
एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. त्यामुळे याचा सर्वाधिक लाभ शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झाला आहे. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजना राबविल्या असून, प्रवास दरात सूट दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मासिक पास, तर विद्यार्थिनींना निःशुल्क प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे.