Pachora Accident : धावत्या रेल्वेखाली सापडून अनोळखी महिलेचा मृत्यू

पाचोरा : येथील रेल्वे स्टेशनजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडून 50 वर्षीय अनोळखी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून पाचोरा रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार 24 ऑगस्ट रोजी रात्री 9:20 वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्टेशन किमी.नं.372/28 ते 26 दरम्यान अप रेल्वे लाईनवर 50 वर्षीय अनोळखी महिलेचा कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घडली आहे.

अनोळखी मयत महिलेचा रंग सावळा, डोक्याचे केस काळे पांढरे, उजव्या हातावर फुलांचे चित्र गोंदलेले, अंगात निळ्या रंगाचे मळकट स्वेटर, गुलाबी रंगाचा परकर, पिवळ्या रंगाचा ब्लाउज असे वर्णन असून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर  घटने प्रकरणी पाचोरा रेल्वे स्टेशन चे उपस्टेशन प्रबंधक यांनी खबर दिल्यावरून  रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चाळीसगाव लोहमार्ग दूरक्षेत्रचे  सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामराव इंगळे हे करीत आहेत.