Election Analysis : विरोधकांच्या कमकुवत संघटनचा किशोर पाटील यांना फायदा

Pachora-Bhadgaon Assembly Constituency, सुरेश तांबे : राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि बहीण-भावात लढत असलेल्या विधानसभेच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघात महायुतीकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी तिसऱ्यांदा बाजी मारत हॅट्ट्रिक केली आहे. विरोधकांच्या कमकुवत संघटनचा त्यांना फायदा झाला, असे मानले जात आहे.

मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आमदार किशोर पाटील आणि त्यांची बहीण व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आणि भाजपमधून बंडखोरी करीत सलग दुसऱ्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अमोल शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ अशी थेट चौरंगी लढत रंगली होती. निवडणुकीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली, तर गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार अमोल शिंदे हे तिसऱ्या स्थानी राहिले. आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघात तीन हजार कोटींची केलेली विकासकामे, तसेच लाडकी बहीण योजनेचा प्रचार, यात गेल्या १० वर्षांपासून आमदार असल्याने पाचोरा-भडगाव तालुक्यातील

प्रत्येक गावात जनसंपर्क, महायुतीचे संघटन, आर्थिक पाठबळ हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले. याउलट विरोधकांचे प्रचार संघटन कमकुवत असल्याने त्यांना फटका बसला आणि मतदारांनी महायुतीच्या बाजूने आपली मते टाकली. महायुतीचे संघटन व प्रचार यंत्रणेचा योग्य वापर, मतदारसंघात केलेली विकासकामे व लाडकी बहीण योजनेसह लाभदायक योजनांचा प्रचार, कार्यकर्ते व समाजाशी बांधलेली मोट ही रणनीती आमदार किशोर पाटील यांच्या उपयोगी ठरली. दोन वर्षांपूर्वी राजकारणात आल्याने अनुभवाची कमतरता, ग्राउंडवर कार्यकर्त्यांची वानवा, अपक्ष उमेदवार, मि त्रपक्षांत बंडखोरीमुळे फटका ही रणनीती अपयशी ठरली आहे.

आर. ओ. तात्या पाटलांच्या कन्येला नाकारले, पुतण्याला पाठबळ
विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा जिंकून जळगाव हा युतीचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महायुतीच्या लाभदायक योजना, लाडकी बहीण, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा एकमेकांचा समन्वय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बजावलेल्या भूमिकेमुळे महायुतीने यशाला गवसणी घातली. मतदानात महिलांचा उत्साह सर्वाधिक होता. पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपचे बंडखोर अमोल शिंदे यांना पराभवाचा पुन्हा धक्का बसला. भावाविरुद्ध बहीण निवडणूक आखाड्यात उतरली. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली. शिवसेनेचे जिल्हा नेते (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्येला नाकारून पुतणे आमदार किशोर पाटील यांना मतदारांनी पाठबळ दिले. यात मात्र मताचे विभाजन झाल्याचेही दिसून आले.