पाचोरा शहर अवैध ऑनलाइन चक्रीच्या विळख्यात, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

पाचोरा : शहरात खुलेआमपणे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध ऑनलाइन चक्रीने तर धुमाकुळ घातला आहे. या अवैध धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असून, शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे.

शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत चक्री जुगाराचा अड्डा राजरोसपणे सुरू असून, यामुळे तरूण पीढी बिघडत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह महिलांकडून होत आहे.

चक्रीने अनेक जण कर्जबाजारी
चक्री खेळात अनेक जण कर्जबाजारी झाले असल्याचे चित्र असून या कर्जबाजारातून काहींचा बळी देखील गेला आहे. तर काहींचे संसार उध्वस्त झालेय. या चक्रीत खेळ खेळताना काहींना जमीन, वाहन, प्लॉट, मोबाईल देखील गमवावे लागत असल्याचे चित्र आहे.

अवैध धंद्या संदर्भात यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भाजप, मनसेतर्फे निवेदन देण्यात आले  तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांनाही राकपाचे माजी नगर सेवक भूषण वाघ यांनी निवेदन दिले. मात्र, अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत असून स्थानीय आमदारांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.