पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील खडकी (अंतुर्ली) गावाचे ३३ वर्षिय फौजी जवान शेतात वडीलांना मदतीसाठी गेले असतांना शेतातुन परतीचा प्रवास करतांना विज पडल्याने जागेवरच फौजी गतप्राण झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरातील रहिवासी असलेले तालुक्यातील खडकी (अंतुर्ली ) येथील सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे (वय-३३) हे नवीन घराची वास्तुशांती करण्यासाठी रजा घेऊन घरी आले होते. दि. ९ रोजी दिवसभर परीवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनी चे दर्शन घेऊन आपल्या गावी आले असता अचानक सायंकाळी पावसाची रीमझीम सुरू झाली तेव्हा हातातील मनगटी घड्याळ आणि मोबाईल विजे पासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवून आपल्या बाईकवर वडीलांना मदतीसाठी शेतात धाव घेतली असता विजेचा कडकडाट होत असतांना वडीलांपासून अवघ्या १०० फुटांच्या अंतरावर असतांना भुषण बोरसे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेची वार्ता पाचोरा तालुक्यात पसरल्याने सर्वत्र शोककळा पसरली.
भुषण बोरसे हे बिहार येथील मोतीहारी ७टि १बीएन बटालीय मध्ये सशस्त्र सिमा बल मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,आई,वडील असा परीवार आहे. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष यांनी तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन बोरसे परीवाराचे सात्वंन केले. स्व. भुषण बोरसे यांनी नवीन वास्तू बांधली असल्याने वास्तुशांती कार्यक्रमासाठी रजेवर घरी आले होते. यासाठी काही दिवसांपासून पत्रिका वाटत होते. अशातच या घटनेमुळे सर्वांनाच हळहळ व्यक्त होत आहे. तहसीलदार यांनी तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष यांनी केली आहे.
नेमकी विज पडली कशी
भुषण बोरसे जेव्हा शेतात वडीलांच्या मदतीला गेले तेव्हा त्यांनी विज अंगावर पडु नये म्हणून हातातील घड्याळ आणि मोबाईल घरीच काढुन ठेवले होते. परंतु वडीलांच्या बैलगाडी मागे येत असतांना इलेक्ट्रिक तारा आणि शेतातील डीपी याच्या कडे विज आकर्षकीत झाली आणी सरळ भुषण बोरसे यांच्या उजव्या खांद्यावर स्पर्श करून गेली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.