Pahur water problem: जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथे पंचायतराज दिनानिमित्त गुरुवारी सकाळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच आशा जाधव अध्यक्षस्थानी होत्या .या सभेत ग्राम विकासाच्या विविध योजनांविषयी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले . ग्रामविकासच्या विविध मुद्द्यांवर आजची सभा चांगलीच गाजली . सुरुवातीला कार्यकारणी सभागृहात गुंडाळली जावू पाहणारी सभा ग्रामस्थांच्या रेट्यामुळे सभागृहात घ्यावी लागली .
या मुद्द्यांवर गाजली सभा
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन संचालनालयातर्फे पहूर येथे श्री समर्थ विठ्ठल मंदिराच्या विकास कामांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे . या कामांचे भूमिपूजन होऊन दोन महिने उलटून गेले असताना देखील प्रत्यक्षात मात्र कुठलेही काम सुरू झालेले नाही . या उलट अस्तित्वात नसलेल्या जय सप्तशृंगी मा निवासिनी ट्रस्ट समोर ४५ लाखांचा भव्य सभामंडप २५ – १५ योजनेतून उभारल्या जात आहे .
याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जामनेर तालुका उपाध्यक्ष ईश्वर हिवाळे यांनी लेखी अर्ज देऊन ग्रामस्थांचे लक्ष वेधले . अर्जात त्यांनी म्हटले आहे की , पहूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर आणि गुपित महादेव मंदिर या मंदिरांच्या विकास कामांना प्रारंभ झालेला आहे . मात्र त्याच विभागाअंतर्गत श्री समर्थ विठ्ठल मंदिराची देखील विकास कामे मंजूर असताना प्रत्यक्षात काय अडथळे येत आहेत , आणि हे अडथळे दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेत, ज्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ विठ्ठल मंदिराच्या विकास कामे सुरू होऊन गावाच्या विकासात हातभार लागेल .
श्री समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सचिव राजाराम जाधव यांच्याशी विकास कामांच्या बाबतीत संपर्क केला असता ते अनधिज्ञ असल्याचे समजते. महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणातर्फे पहूर पेठ व पहूर कसबे गावांसाठी ३७ कोटी रुपयांची संयुक्त पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असताना सदर योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे .
खरंतर २ मे २०२४ पर्यंत वाघुर प्रकल्पातील पाणी पहूर मध्ये यायला हवे होते. २ मे २०२५ पर्यंत संबंधित प्राधिकरणाकडून प्रायोगिक तत्त्वावर योजना पूर्णत्वास घेऊन ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. मात्र मुदत संपून देखील वारंवार ठेकेदारांकडून मुदत वाढवून घेण्याचे प्रकार घडत आहेत. या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना पाण्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे मात्र यात मोठी दिरंगाई होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी नाईलाजास्तव व्यथीत होवून लोकशाही मार्गाने महाराष्ट्र दिनी वाघुर प्रकल्पावर तहान जनआक्रोश मोर्चा नेणार असल्याचे ग्रामसभेत जाहीर केले .
बायोमेट्रिक अटेंडन्स
ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स महत्त्वाची असल्याने थम मशीन उपलब्ध करून द्यावे जेणेकरून ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयात विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी हेलपाटे मारावी लागणार नाहीत .
माहिती अधिकार फलक लावण्यात यावा
ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती फलक लावण्यात यावा तसेच गावात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची माहिती देणारे फलक संबंधित कामांच्या ठिकाणी लावण्यात यावे , संत श्रीपाद बाबा मंदिरासाठी जागा मिळावी अशी मागणी साधक परिवार व ग्रामस्थांनी केली .
यावेळी माजी सरपंच लक्ष्मण गोरे , माजी सरपंच शंकर जाधव , ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव , योगेश भडांगे , सामाजिक कार्यकर्ते मधुकर पवार, सुभाष धनगर, बाळू सुरडकर, सुरेश राऊत यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .