Bomb Blast In Pakistan: पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर सोमवारी (२८ एप्रिल) रोजी मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. पाकिस्तानच्या अशांत वायव्येकडील पाकिस्तानी तालिबानच्या पूर्वीच्या बालेकिल्ल्यात सरकार समर्थक शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात किमान सात जण ठार झाले. तर ९ जण जखमी झाल्याची माहिती. स्थानिक पोलिस प्रमुख उस्मान वझीर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील दक्षिण वझिरिस्तानमध्ये सरकार समर्थक शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर हा बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यातील मुख्य शहर वाना येथे झाला. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर १६ जखमींना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की स्फोट इतका मोठा होता की शांतता समितीच्या कार्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली आणि अनेक लोक ढिगाऱ्यात अडकले. या हल्ल्यासाठी पाकिस्तानी तालिबानला जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे. पाक तालिबानला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपी म्हणूनही ओळखले जाते. ते अनेकदा सुरक्षा दलांना आणि नागरिकांना लक्ष्य करतात.
आतापर्यंत कोणत्याही गटाने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ही शांतात समिती तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा उघडपणे विरोध करते. तसेच, ही समिती स्थानिक स्तरावरील वाद मिटवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. पोलीस अधिकाऱ्यांनी हा स्फोट अत्यंत शक्तिशाली असल्याचे सांगितले असून. यामुळे घटनास्थळी मोठी जीवितहानी झाली आहे.
टीटीपी एक दहशतवादी गट
टीटीपी हा एक वेगळा दहशतवादी गट आहे, परंतु तो अफगाण तालिबानचा जवळचा मित्र देखील आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी शेजारील अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली, जेव्हा २० वर्षांच्या युद्धानंतर अमेरिका आणि नाटो सैन्य देशातून माघारीच्या अंतिम टप्प्यात होते. तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून अनेक टीटीपी नेते आणि लढवय्यांनी अफगाणिस्तानात आश्रय घेतला आहे. ते उघडपणे जगत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी तालिबानचे मनोबलही वाढले आहे.