जळगाव : तालुक्यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्थळावर (मजार) पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवार, 18 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील हिंदूत्ववादी कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती कळाल्यानंतर त्यांनी ध्वज ताब्यात घेतला होता मात्र या प्रकरणी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत होता. हा प्रकार देशद्रोहात मोडला जाणारा असताना पोलिसांच्या एकूणच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने विश्व हिंदू परीषद, बजरंग दलाचे जिल्हा कार्यकर्ता हेमंत गणेश गुरव (लोहारा, ता.पाचोरा) यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले आहेत.
असे आहे नेमके प्रकरण
जळगाव शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील विटनेर येथे एका प्रार्थनास्थळावर (मजार) वर प्लंबर गोपाळ सुपडू कहार (नेरी, ता.जामनेर) यांनी पाकिस्तानच्या ध्वजासारखा ध्वज लावल्याची बाब उघडकीस आली होती. बुधवार, 18 जानेवारी रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदूतत्वादी कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते व त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी गोपाळ कहार यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्याला स्वप्न पडल्याचे सांगून प्रार्थनास्थळावर (मजार) ध्वज नसल्याने तो लावण्याची आज्ञा झाल्याने आपण हा ध्वज लावल्याचे त्यांनी कबुली दिली मात्र
असा ध्वज हा पाकिस्तानचा असतो, अशी आपल्याला कल्पनाही नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले होते.
हा तर देशद्रोहाचा प्रकार : न्यायालयात याचिका
विटनेर गावातील दर्ग्यावर पाकिस्तानी ध्वज लावण्याचा प्रकार म्हणजेच देशद्रोह असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदूतत्वादी संघटनांनी एमआयडीसी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका न घेतल्याने विहिंपचे पदाधिकारी हेमंत गणेश गुरव (लोहारा, ता.पाचोरा) यांनी जळगाव न्यायालयात अॅड.केदार भुसारी व अॅड.धनराज झोपे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती. या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर जादु/टोणा, अंधश्रद्धा पसरविण्यासारखे प्रकार चालतात, अशी ओरडही स्थानिकांकडून होत असल्याचा दावा गुरव यांनी केला शिवाय व देशविरोधी राष्ट्राचा झेंडा लावल्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
न्या.जे.एस.केळकर यांच्या न्यायासनापुढे या संदर्भातील सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवार,. 17 रोजी राजद्रोह / देशद्रोहाचे 124अ, 153 अ,295 अ, 505, 34 नुसार गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांची भूमिका संशयास्पद म्हणूनच याचिका दाखल
या प्रकाराबाबत तक्रारदार हेमंत गणेश गुरव म्हणाले की, विटनेर येथील प्रकाराबाबत पोलिसांना सविस्तर माहिती देवून तक्रारअर्ज दिल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक . जयपाल हिरे यांची भूमिकादेखील या प्रकरणात संशयास्पद राहिल्याने आपण न्यायालयात दाद मागितली व या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे भारत देशाच्या स्वाभिमानाला व अस्मितेला ठेच पोहोचविण्यासाठीचा तसेच भारताचा शत्रू
राष्ट्राचा ध्वज लावून कायद्याने स्थापित असलेल्या देशाच्या विरोधात अप्रिती दर्शविण्यासाठीचा प्रयत्न तसेच देशाच्या विरोधात घोषणाबाजी सारखे प्रकार कोठेच होवू नये म्हणून न्यायालयात दाद मागण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पोलिसांनी जाणीवपूर्वक दाबले प्रकरण : अॅड.केदार भुसारी
मूळात पोलिसांनी त्याच दिवशी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. भारतामध्ये कायदेशीर स्थापन झालेल्या शासनाबद्दल व्देषाची किंवा तुच्छतेची भावना निर्माण करणे वा लेखी अथवा खुणांमार्फत अगर दृश्य देखाव्यामार्फत तसा प्रयत्न करणे हा प्रकार राजद्रोहात मोडला जातो. असे घडल्यानंतरही पोलिसांनी हे प्रकरण हे जाणिवपुर्वक दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदार हेमंत गुरव यांनी हा सर्व प्रकार त्या ठिकाणी जावून उघड केला परंतू हे प्रकार जिल्ह्यात कुठेही होता कामा नये यासाठी पोलिस प्रशासनाने तसेच जागरूक नागरीकांनी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. जळगाव न्यायालयाने देशद्रोहाच्या कलमांसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याने या आदेशाचे स्वागत करतो शिवाय या प्रकरणाची चौकशी निरीक्षकांऐवजी पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांनी करावी जेणेकरून या प्रकरणात पारदर्शकता येण्यास मदत होईल, अशी भावना अॅड.केदार भुसारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे म्हणाले की, न्यायालयाचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त होताच कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल.