जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या पिंप्राळा उपनगरातील रथोत्सवास भक्तिमय वातावरणात बुधवारी दुपारी विठ्ठलनामाच्या गजरात प्रारंभ झाला. जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यंदा रथोत्सवाचे 149 वर्ष आहे. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास रथाचे चाक थेट गटारात अडकल्यानंतर रथ इमारतीवर आदळल्याची घटना घडली. मात्र, यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पिंप्राळा उपनगरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त बुधवार, 17 जुलै रोजी ऐतिहासिक रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रथाला पानाफुलांनी सजवून, आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली. रथोत्सव पाहण्यासाठी खानदेशातील विठ्ठलभक्तांचा जनसागर लोटला होता.
मान्यवरांच्या हस्ते महाआरती
आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदींच्या हस्ते महाआरती झाली.
मान्यवरांची होती उपस्थिती
महाआरतीप्रसंगी जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, भालचंद्र पाटील, माजी पोलीसपाटील विष्णू पाटील, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, परशुराम सोमाणी, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, विजय पाटील, मयूर कापसे, प्रकाश कोठारी, विष्णू भंगाळे, शोभा बारी, हसिनाबी शेख, सुरेश सोनवणे, पुरुषोत्तम सोमाणी, प्रभाकर पाटील, मंगलसिंग पाटील, अमर जैन, चंद्रकांत सोनवणे, श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी, रथोत्सव समितीचे प्रमुख अनिल वाणी, राकेश वाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते मोगरी लावणार्यांचा सत्कार करण्यात आला. आयोजकांतर्फे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
पिंप्राळा गावातील जुन्या ग्रामपंचायतीजवळील बारीवाडा भागातील रथ चौकातून महाआरतीनंतर दुपारी सव्वाच्या सुमारास जानकाबाई की जय व पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषात उपस्थितांसह विठ्ठलभक्तांनी दोराच्या सहाय्याने रथ ओढण्याचा आनंद लुटला. रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंगे हे भाविकांचे आकर्षण ठरले.
गावातील साथी मित्रमंडळाजवळील रस्त्याच्या उतारावरून रथ ओढला जात असताना उतारावर वेगात असलेला रथ भाविकांच्या आटोक्यात न आल्यामुळे रथाचे चाक गटारात गेले आणि थेट इमारतीवर जाऊन आदळला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. गटारात अडकलेल्या रथाची चाके काढण्यासाठी भाविकांना चांगलीच कसरत करावी लागली. मात्र, त्यांच्याकडून रथाची चाके न निघाल्याने आमदार भोळे यांनी अखेर क्रेन व जेसीबी मागविला. जेसीबीच्या सहाय्याने रथाची चाके गटारातून बाहेर काढण्यात आली. पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर रथ पुन्हा मार्गस्थ झाला.