मातृभूमीसाठी आणि प्राचीन संस्कृतीसाठी बलिदान देणारे ‘परमवीर अब्दुल हमीद’ यांना सरसंघचालकांनी केले अभिवादन

मुंबई: आपल्या मातृभूमीसाठी आणि प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या संस्कृतीसाठी बलिदान देणारा शूर योद्धा परमवीर अब्दुल हमीद हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांचे बलिदान आपल्या सदैव स्मरणात राहील. त्यांचे जीवन मातृभूमी आणि राष्ट्रासाठी समर्पित होते.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

परमवीर अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त धामुपूर (गाझीपूर) येथे सोमवार, दि. १ जुलै रोजी रामचंद्रन श्रीनिवासन लिखित ‘मेरे पापा परमवीर’ हे पुस्तक सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दरम्यान सरसंघचालकांनी परमवीर अब्दुल हमीद आणि त्यांच्या पत्नी स्व. रसूलन बीबी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

परमवीर अब्दुल हमीद यांच्याबद्दल बोलताना सरसंघचालक पुढे म्हणाले, अब्दुल हमीद यांच्या जीवनाचा आदर्श आम्हा सर्वांना एकत्र बांधतो. काळ कितीही प्रतिकूल असला तरी काही गोष्टी अशा असतात ज्या विसरल्या जात नाहीत, मिटत नाहीत. वेळ आल्यावर त्या हृदयातून बाहेर पडतात. परमवीर अब्दुल हमीद हे आपल्यासाठी एक उदाहरण बनले आहेत. भारतीय सैन्यातील सैनिक आपल्या पगारासाठी लढत नाहीत, ते आपल्या देशासाठी लढतात. आयुष्य असे असले पाहिजे की ते आपल्यासाठी अनुकरण करण्यासाठी एक उदाहरण बनेल.”