Paris Olympics 2024 : सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

भारतीय हॉकी संघाने शूटआऊटमध्ये इंग्लंडचा 4-2 असा पराभव केला आहे. पूर्णवेळपर्यंत दोन्ही गुण १-१ असे बरोबरीत होते. पण शूटआऊटमध्ये पीआर श्रीजेशच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर भारताने कांस्यपदक जिंकले. यावेळीही टीम इंडियाकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही
भारत आणि ग्रेट ब्रिटन या दोन्ही संघांनी पहिल्या क्वार्टरमध्ये चमकदार कामगिरी केली आणि गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र दोन्ही संघातील कोणालाही यश मिळाले नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये पीआर श्रीजेशने ग्रेट ब्रिटनने केलेले अनेक उत्कृष्ट गोल वाचवले. भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. मात्र भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे पहिला क्वार्टर गोलशून्य राहिला.

हरमनप्रीत सिंगने गोल केला
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय हॉकी संघाने आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. याच क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडू अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आले. यानंतर भारतीय संघाने उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळला. या सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगची दमदार कामगिरी कायम राहिली. त्याने 22व्या मिनिटाला गोल केला. मात्र यानंतर ग्रेट ब्रिटनच्या ली मॉर्टनने गोल केला. यामुळे ब्रिटनने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. भारत 10 खेळाडूंसह खेळत होता, त्यामुळे ग्रेट ब्रिटनचा संघ सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण पीआर श्रीजेशने एकही गोल होऊ दिला नाही.

निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊट झाला. यामध्ये भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग, सुखजित सिंग, ललित उपाध्याय आणि राजकुमार पाल यांनी गोल केले. तर इंग्लंडचे दोन शॉट पीआर श्रीजेशने वाचवले. भारताच्या विजयात तो सर्वात मोठा हिरो ठरला आहे. तो ब्रिटन आणि गोल यांच्यातील मोठी भिंत बनला. त्याच्यामुळेच टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता आली आहे.