Parola : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर सबगव्हाण गावाजवळ आज पासून सुरू होणाऱ्या टोल बाबत स्थानिक नागरिकांनी एकजूट दाखवत प्रशासनास निवेदन दिले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला.
याबाबत डॉ. योगेंद्र पवार यांनी माहिती देतांना सांगितले की, आज सकाळी ८ वाजेपासून टोल आकारणी सुरू होणार आहे. यात ट्रक ,बस याना रू ३६५ मोजावे लागतील तर हलके वाणिज्य वाहने मालवाहू वाहने यांना १७५ ते २६० रू असून कार, प्रवासी वाहने याना ११० ते १६० रू तीन एक्सल वाहने ४०० ते६०० बांधकाम साठी नेणाऱ्या वाहनांना ५७५ते ८०० तर मोठी वाहनांना ७०० ते १०५० रू मोजावी लागणार आहे. यात २० किमी अंतरावर असलेल्या वाहनांना मासिक पास ३३० रू दिली जाणार आहे. यात रोज ये जा करणाऱ्या व नियमित न जाणाऱ्या वाहनांना एकच नियम लावले जात असून या बाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या बाबत टोल प्राधिकरण अधिकारी वर्गाने समितीचे म्हणणे ऐकून या बाबत स्थानिक वाहन धारकासाठी नवी नियमावली करावी. सदर महामार्ग हा अपूर्ण अवस्थेत असून अपूर्ण काम असतांना त्याचे शासकीय उद्घाटन करणे अजून राहिले आहे.
सदर विषयात विद्यमान आमदार, खासदार यांचे कोणतेही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच याबाबत संबंधितांनी तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकावासियांनी दिलेला आहे.
यावेळी मागणीचे निवेदन पारोळा तहसिलदार उल्हास देवरे, पो नि सुनील पवार यांना देण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या कडूनही निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, जि प सदस्य रोहन पवार, ऍड तुषार पाटील, दीपक अनुष्ठान, डॉ. शांताराम दाजीबा पाटील, मनोराज पाटील, संतोष महाजन, डॉ शांताराम पाटील, महेश पाटील, विजय पाटील, गणेश पाटील, केशव क्षत्रिय, शशिकांत साळुंखे, अशोक ललवाणी, प्रा जे बी पाटील, कपिल चौधरी, रवि जाधव लोकेश पवार, वना महाजन, ललित सोनवणे, सुवर्णा पाटील, जयश्री साळी ,स्वाती शिंदे, किशोर पाटील, सुनील देवरे यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व पत्रकार बांधव, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक व्यापारी, वाहन चालक अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
महामार्गावर काम बाकी; टोल सुरु
या महामार्गावर नही कडून हायमास्ट लॅम्प, दिशा दर्शक फलक, कॅटल गार्ड, फूट पाथ, गटारी, स्वच्छता गृह, अंबुलन्स, अपघात होऊ नये यासाठी आवश्यक हायमास्ट लॅम्प, गती रोधक, झेब्रा क्रॉसिंग, पारोळा शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर रस्ते दुभाजक, जुना महामार्ग दुरुस्ती या प्रकारचे अनेक कामे अजून करावयाचे बाकी आहे त्यामुळे सर्व कामे पूर्ण झाल्यावर वीस किलोमीटर अंतर्गत सर्व स्थानिक लाभार्थ्यांना खाजगी वाहनांसाठी वीस रू प्रति फेरी या प्रमाणे टोल आकारणी करावी अशी मागणी सर्व नागरिकांनी केली आहे.