---Advertisement---
संत गाडगे बाबा पुण्यतिथी विशेष
विशाल महाजन
तरुण भारत लाईव्ह न्युज : पारोळा येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीची स्वच्छता आणि दुरुस्तीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली होती. ही बाब माजी उपनगराध्यक्ष डॉ. मंगेश सुधाकर तांबे यांनी हेरून स्वच्छतेसह दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परिणामी स्मशानभूमीला नवसंजीवनी प्राप्त होत आहे. अस्वच्छतेचा नायनाट करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेले संत गाडगे बाबा यांना डॉ. तांबे यांनी प्रत्यक्ष कृतीतून आदरांजली वाहिली आहे.
शहरातील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीच्या सभोवताली परिसरात वाढलेली झाडे-झुडपे अस्वच्छता यामुळे एखाद्या जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सरण रचण्याच्या स्थळी मोठमोठे खड्डे पडले होती. पिलरचे लोखंडी गज बाहेर आले होते.
आगीच्या ज्वाळानी लोखंडी कठडे कमकुवत झाले होते. परिणामी नागरिकांना सरण रचणे अवघड बनले होते. तसेच काही भागात सिमेंट रोड नसल्याने पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. यासह विविध समस्यांनी नागरिक त्रासले होते. याची माजी उपनगराध्यक्ष डॉ. तांबे यांनी दखल घेत स्वखर्चाने स्वच्छतेसह दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
यात स्मशानभूमीत जेथे सिमेंट रोड नाही त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, प्लास्टर करणे यासह बसण्यासाठी नव्याने बाकासह विविध कामे वेगाने सुरू आहेत.
स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कामगार नियुक्त
संत गाडगे बाबा यांची २० डिसेंबर रोजी पुण्यतिथी. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व दिले होते. गावागावात घराघरात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले होते. एवढेच नव्हे तर आपलं पूर्ण जीवन अस्वच्छतेचा नायनाट करण्यासाठी खर्ची घातले होते .त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मशानभूमी स्वच्छता दुरुस्ती करणे तर सुरूच आहे. पण कायमस्वरूपी स्वच्छता नांदावी यासाठी डॉ. तांबे यांनी आजपासून स्वखर्चाने धुळे रोडवरील स्मशानभूमीत व धरणगाव रोडवरील स्मशानभूमीत स्वच्छता व साफसफाईसाठी कामगार कायमस्वरुपी नियुक्त केले आहेत. परिणामी दोन्ही ठिकाणी नियमित स्वच्छता केली जाणार आहे.









