---Advertisement---

शेतकऱ्यांनो, ‘या’ स्पर्धेत सहभाग घ्या अन् मिळवा बक्षीस

---Advertisement---

Crop Competition : प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत यंदाच्या हंगामासाठी राज्यस्तरीय अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पीक स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

शेतकरीवर्गाकडून आज शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रयोगशील शेतकरी अगदी कोरडवाहू, खडकाळ जमिनीवरही विविध धान्ये पिकवून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. अशा शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाकडून पीक स्पर्धा घेतली जात आहे. विशेष म्हणजे, जिल्हा आणि तालुक्यातील शेतकरी यांनी बक्षीस मिळविल्यास त्यांच्याकडे बघून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, हादेखील या स्पर्धेमागील शासनाचा मुख्य हेतू आहे.

यात सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ). ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. ७/१२, ८-अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बैंक खाते चेक, पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.

स्पर्धेसाठी पात्रता व निकष

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व स्वतः कसणे आवश्यक आहे. एकावेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

खरिपातील ११, रब्बीतील ५ पिकांचा समावेश

खरिपामधील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, मका, सोयाबीन, सूर्यफूल व भुईमूग या ११ प्रमुख पिकांचा स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय पीक स्पर्धेसाठी शासनाने रब्बी हंगामातील महत्त्वाच्या असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या

अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन कृषी कार्यालयाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---