पाचोरा : पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान प्रयागराजहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्या पाटलीपुत्र एक्सप्रेसमधून उत्तर प्रदेशातील लशन कुमार (25) या युवकाचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 23 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुलशन कुमार (25) (रा. मु. शारदा प्रसाद, नुरपूर, कासापूर, पो. छीतपालगढ, ता. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा आपल्या 13 वर्षीय चुलत भावास मुंबई दाखविण्यासाठी प्रयागराज येथून पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये कुर्ला जाण्यासाठी बसला. दरम्यान सुसाट पाटलीपुत्र एक्सप्रेसने पाचोरा स्टेशन क्रॉस केल्यानंतर काही अंतरावरच गुलशन कुमार याचा पाय घसरला व गुलशान कुमार हा खाली पडला. हा प्रकार त्याच्या भावाने बघताच प्रवाशांच्या मदतीने आपात्कालीन चैन ओढण्यात आली. भरधाव वेगाने धावणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस चैन ओढल्याने थांबल्यानंतर गुलशन कुमार याचा भाऊ एक्सप्रेस मधुन उतरुन घटनास्थळी धावत गेला असता त्यावेळेपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते. गुलशन कुमार हा अप लाईनच्या रेल्वे रुळानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. 370/20/22 दरम्यान मृत अवस्थेत आढळुन येताच चिमुकल्या भावाने एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला कळताच रुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार यांच्यासह पोलीस हवालदार निवृत्ती मोरे (महाराज) घटनास्थळी दाखल झाले. मयत गुलशन कुमार याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.