तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । कोलंबियाच्या बोगोटा येथे 2 ते 12 डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या देवेश पंकज भैया याने सुवर्णपदक जिंकले आहे. 19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये भारतानं चमकदार कामगिरी करून दाखवली.
भारताला सहा सुवर्णपद
या स्पर्धेत अरित्रा मल्होत्रा (दिल्ली), राजदीप मिश्रा (जामनगर), देवेश पंकज भैया (जळगाव), वासु विजय (कोटा), बनिब्रता माजी (हैदराबाद) आणि अवनिश बंसाल (देहरादून) यांनी सुवर्णपदक जिंकून कोलंबियात भारताचा तिरंगा फडकावला. प्रा. चित्रा जोशी (निवृत्त,आर. रुईया ज्युनियर कॉलेज, मुंबई), डॉ. सुभोजित सेन (UM-DAE CEBS, मुंबई), विशाल देव अशोक (S.I.E.S. कॉलेज ऑफ विज्ञान आणि कला, मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सहा सुवर्णपदकांची कमाई केलीय.
सुवर्णपदकं जिंकणारा भारत एकमेव देश
यंदाच्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये एकूण 35 देशातील 203 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होते. 19व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड पदकतालिकेत भारतानं सहा सुवर्णपदक जिंकून अव्वल स्थान पटकावलं. हा सुवर्णपदकं जिंकणारा भारत एकमेव देश ठरला. या स्पर्धेत एकूण 20 सुवर्ण, 42 रौप्य आणि 59 कांस्य पदके देण्यात आली.
महाराष्ट्रातून देवेश हा एकमेव विद्यार्थी
दरम्यान, जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्याने दुबई येथे पार पडलेल्या अठराव्या इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये देखील देशाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकाविले होते. यासाठी देशातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. महाराष्ट्रातून देवेश हा एकमेव विद्यार्थी होता.