पाटण्यात विरोधकांची बैठक सुरु; ‘ह्या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता!

बिहार  :  पाटणामध्ये देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत.

या बैठकीमध्ये लोकसभेच्या ४५० जागांवर भाजपच्या विरोधात सामान्य उमेदवार उभा करायचा का? पंतप्रधान मोदींच्या विरोधात कोणाचा चेहरा पुढे करायचा की सामूहिक नेतृत्वाखाली लढायचा? या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यूपीए संयोजक आणि यूपीए निवडणूक प्रचार प्रमुख पदाबाबत चर्चा होणार आहे. त्याचसोबत, तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा आणि मणिपूर हिंसाचार यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. सर्व विरोधक मिळून मोदी विरुद्ध कश्या पद्धतीनं निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी विरोधी पक्ष मिळून करत आहेत