जळगाव : महानगर पालिका कर्मचारी व अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लावण्यात आलेला आहे. परंतु, त्यांना सातवा वेतन आयोगाचे फरकाची रक्कमेचा एकही हप्ता आजपर्यंत मिळालेला नाही. १५ दिवसांचे आत सातव्या वेतन आयोगाचे ५ थकीत हप्त्यासह एकरक्कमी तात्काळ अदायगी करण्यात न आल्यास कर्मचाऱ्यांसह कामबंद आंदोलन छेडेल जाईल असा इशारा अखिल भारतीय मजदूर संघातर्फे बुधवार, २६ रोजी देण्यात आला. यासंदर्भातील निवेदन जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना देण्यात आले.
मनपा कर्मचारी, अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागु करण्यांत आलेला आहे. परंतु, जळगाव महानगरपालिकेत सातव्या वेतन आयोगा संदर्भातील फरकाच्या रक्कमेचा एकही हप्ता संबंधीत कर्मचाऱ्यांना,अधिकाऱ्यांना अद्याप पावेतो मिळालेला नाही. जिल्हयात व राज्यात आता पावेतो सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कमेसह हप्ते मिळालेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
सध्या मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असून मुलांचे शाळेची फी व इतर शालेय उपयोगी साहित्य तसेच कॉलेज मधील मुलांचे अॅडमीशन व त्यासाठी लागणारी फी देणे कर्मचाऱ्यांना जीकीरीचे जात आहे. सातव्या वेतन आयोगाचे फरकाची रक्कम इतर विभागांना मिळू शकते तर जळगाव महानगरपालिका कर्मचाऱ्यांना का मिळू शकत नाही याबाबत योग्य ती तात्काळ कार्यवाही करावी व संबंधीत अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची बिले बनविण्याचे योग्य ते आदेश निर्गमीत करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. १५ दिवसांचे आत सातव्या वेतन आयोगाचे ५ थकीत हप्त्यासह एकरक्कमी तात्काळ अदायगी करण्यात न आल्यास कर्मचाऱ्यांसह कामबंद आंदोलन छेडेल जाईल असा इशारा देण्यात आला. यासोबत सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामांत येणाऱ्या अडचणींबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील काही अधिकारी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हेतुपुरस्कर त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.