जळगाव, 10 जुलै
शहरात व्यापारी संकुलासह मुख्य परिसरातील रस्त्यांवर वाहनधारकांच्या गर्दीमुळे पादचार्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत आहे.रस्ता अ्रोलांडणे ज्येष्ठ, नागरीक, महिला, मुले यांच्यासाठी कठीण बाब झाली आहे. यामुळे पायी चालणार्यांना वाहनधारक कट मारून निघून जातात. त्यासाठी पादचारीसाठी रस्ता क्रॉसिंगची विशिष्ट व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. यात शहरातील फुले मार्केट, गोलाणी मार्केट परिसर, बी.जे.मार्केट, भास्कर मार्केट आदी ठिकाणी पायी चालणार्यांना अपघाताला सामोरे जावे लागते.
शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळ नसल्याने थेट रस्त्यांवर वाहने लावण्याची वेळ वाहनधाकरांवर येत आहे. यामुळे दररोज वाहतूक विस्कळीत होऊन खोळंबा होत आहे. त्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाहतूकीची समस्या सोडविण्याबाबत सर्वच पातळीवर निराशा दिसत असल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत. त्यातच शहरातील मुख्य चौकामध्ये रस्ता ओलांडतांना पादचार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
स्टेट बँक चौक या परिसरात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यानींची नेहमीच वर्दळ असते. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आहे. तसेच गावातून शहरात येणार्या लोकांची ये-जा सुरू असल्याने गर्दी होते. वाहनधारक अचानक रस्ता क्रॉस करीत असल्याने स्टेट बँकेजवळ वाहनांची कोंडी होत असते.
पार्कीग सुविधेचा अभाव
काही व्यापारी संकुलांमध्ये वाहन पार्किंगची सुविधा असली तरी ती अपूर्ण पडत असल्याचा अनुभव येत आहे. कारण दुचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पार्कींगला जागा मर्यादित आहे आणि रस्ते ही पूर्वीसारखेच आहेत. त्यांचा ना विस्तार झाला, एकतर्फी वाहतूकीचा पर्यायाचाही विचार झाल्याचे दिसत नाही. त्यातच भरधाव वेगाचे बेशिस्त वाहनचालकांमुळे लहान मोठे अपघाताला निमंत्रण मिळून निरापराधी व्यक्तींना दुखापत होत असल्याच्या घटना घडत आहेत.
मार्केट परिसरात वाहतूक कोंडी,
शहरातील सुभाष चौक, दाणाबाजार, टॉवर चौक, गांधी मार्केट हे नेहमीच वर्दळ असते. दाणाबाजारात मोठ्या वाहनांसह लहान वाहन येत असल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. सुभाष चौक परिसरात दाणबाजार, सराफबाजार तसेच भाजीपाला विक्रेत्यांची लोडगाडी या परिसरात असते. शहरासह तालुक्यातील ग्राहक याठिकाणी येऊन वस्तू खरेदीला पसंती देत असतात. या परिसरात देखील नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसते.
सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग मनपाची जबाबदारी
शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने पार्कींगची पुरेशी सोय नाही. पार्कींग, सिग्नल प्रणाली, झेब्रा क्रॉसींग याबाबत मनपाकडे अधिकार आहेत. सिग्नलप्रणाली संदर्भांत मनपाने ठेकेदाराला कंत्राट दिला आहे. ही यंत्रणा लवकर सुरू झाल्यास वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होईल. सिग्नल सुरू करण्यासाठी साईडचे रस्ते चांगले असले पाहिजे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहे. त्यामुळेही वाहतुकीवर परिणाम होतो. अजिंठा चौफुली, इच्छादेवी, आकाशवाणी शहरातील मोक्याच्या ठिकाणी सिग्नल व स्ट्रीट लाईट असायला हवेत. सिग्नल सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकार्यांकडे हा विषय मांडला आहे. रस्त्यावरील वाहने उचलण्याचे काम वाहतूक शाखेच्या वतीने सुरूच आहे.
लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा