नवी दिल्ली : “२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशवासीयांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या विजयातून जनतेचा त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो, पण विरोधकांना देशातील जनतेने नाकारले हे बालबुद्धी विरोधी पक्षनेते समजू शकलेले नाही.” अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली. पीयूष गोयल रविवारी दिल्ली प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “बालकाच्या मनाला हा पराभव पचवता येत नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाशी लढूनही काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. गोयल म्हणाले की, “केंद्र सरकारने दिल्लीच्या विकासासाठी अनेक कामे केली आहेत, तर केजरीवाल सरकारने येथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणतेही काम केलेले नाही.”
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी दिल्ली सरकारकडे कोणतीही योजना नाही. या सरकारने ६० कोटी रुपयांची स्टार्टअप योजना सुरू केली आणि तिच्या जाहिरातीसाठी १०० कोटी रुपये खर्च केले. अशी टीकाही त्यांनी केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारवर केली. दिल्ली सरकारचे बजेट ८० हजार कोटी रुपये आहे, जर ते प्रामाणिकपणे खर्च केले तर दिल्लीचा चेहरामोहरा बदलू शकतो, असेही ते म्हणाले.
दिल्लीच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, “दिल्लीच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना जिंकावे लागेल. डबल इंजिन असलेल्या सरकारमुळे दिल्लीचा विकास शक्य होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मोदी सरकारचे यश तसेच केजरीवाल सरकारचे अपयश आणि भ्रष्टाचार सांगावा लागेल.”