तरुण भारत लाईव्ह । २४ जानेवारी २०२३। स्वस्तात जाहिरात बाजी म्हणजे दिसला चौक लाव बॅनर्स अशी शहरातील नेते मंडळींची धारणा झाली असून, ‘सुंदर शहर, स्वच्छ शहर’ ही संकल्पना मागे पडून बॅनर्सचे शहर अशी ओळख जळगाव महानगराची झाली आहे. याकडे शहर महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा आहे मात्र त्याकडे कोणीही दहशतीमुळे लक्ष देत नसल्याचेच लक्षात येते.
राज्यातील अनेक महापालिका केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ शहर’ अभियानात भाग घेत असतात. यास जळगाव शहर महापालिका अपवाद नाही. मात्र यासाठी ज्यावेळी समिती येते तेव्हा अगदी आयुक्तांपासून अधिकारी रस्त्यावर उतरतात. शहर चकाचक होते. रस्ते खराब असले तरी त्यावरील कचरा गायब होतो. हगणदरीची ठिकाणे स्वच्छ होतात. तेथे कोणी बसू नये म्हणून सुरक्षा रक्षक सकाळपासून पहारा देत उभे केले जातात. त्यामुळे ही समिती आठवड्यातून एक-दोन वेळा शहरात यावी अशी कोटी शहरातील नागरिकांकडून केली जात असते.
विद्रूपीकरणाचा कळस
सद्य:स्थितीत शहर विद्रूपीकरणाची जणू स्पर्धाच लागली असल्याचे दिसून येते आहे. ‘दिसला चौक लाव बॅनर्स’ अशी परिस्थिती सर्वत्र दिसते. काही जणांची हिंमत एवढी की महापालिकेच्या समोर बॅनर्स लावतात. वाढदिवस हा आनंदाचा क्षण त्यामुळे एखादा दिवस बॅनर्स लावणे ठिक पण बर्याच चौकात पंधरा दिवस उलटून जातात तरी हे बॅनर्स काढले जात नाही. विशेष म्हणजे महापालिकेकडे यासाठी स्वतंत्र यंत्रणा असताना त्याकडे डोळेझाक केली जात असते. शहर विद्रूपीकरणाचा जणू कळस झाल्याची परिस्थिती शहरातील विविध भागात दिसून येते.
सोनवणे, कोल्हेंची परवानगी पण…
शहरात महापालिकेच्या सूत्रांकडील माहितीनुसार, केवळ 89 बॅनर्स लावण्याची परवानगी काही नेते, संस्थांनी घेतली आहे. मात्र विविध भागातील अवलोकन केले असता सुमारे 415 लहान, मोठे बॅनर्स दिसून येतात. याचा अर्थ अन्य बॅनर्स हे विनापरवानगी लावण्यात आले आहेत.
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या समर्थकांनी शहरातील काही बॅनर्स लावले आहेत. त्यापैकी 4 ते 5 ठिकाणी बॅनर्सची परवानगी घेण्यात आली आहे. तसेच माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांनीदेखील काही भागात बॅनर्स लावण्याची परवानगी घेतली असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.
कारवाई गरजेची
शहरात मोठ्या प्रमाणात बॅनर्सची अनधिकृत गर्दी असताना त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मनपात सद्य:स्थितीत दोन आयुक्त आहेत. त्यापैकी एकही लक्ष देण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती यावरून लक्षात येत असून हे विद्रूपीकरण दूर करावे, अशी मागणी होत आहे.
यंत्रणा दहशतीखाली
शहर विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी मनपात स्वतंत्र यंत्रणा आहे. परवानगी घेतलेल्या बॅनर्स लावलेल्या संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून बॅनर्सच्या आकाराची माहिती ते किती दिवस लावलेे जाणार आहे, याचा उल्लेख प्रत्येक बॅनरवर टाकणे आवश्यक असते. मात्र शहरातील अनेक बॅनर्सवर असा उल्लेख दिसत नाही. यातील बरेच बनर्स हे राजकीय नेते मंडळींचे असल्यामुळे बोलण्याची हिंमतही कोणी करत नाही.