जळगाव : जेईई परीक्षा लक्षात घेत अभ्यासाच्या पूर्व तयारीसाठी दोघांनी खासगी क्लास लावला. मोबाईलमध्ये काढलेला फोटो व्हायरल करेल,अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीला दमबाजी करत वारंवार अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार शहरात जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल आठ महिने चालला. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर पोक्सोअंतर्गत बुधवार 3 रोजी गुन्हा दाखल झाला.
मुलीचा फोटो केला एडिट
अल्पवयीन मुलगी 17 वर्षीय असून ती मुळ भुसावळ तालुक्यातील आहे. ती 12 वीचे शिक्षण घेत आहे. जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी ती जुलै 2022 पासून जळगाव शहरात भाडेतत्वावर एका रुममध्ये वास्तव्य करीत आहे. खाजगी क्लासला रुमवरुन जात येत होती. मुळ यावल तालुक्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगाही याच क्लासमध्ये परिक्षेच्या तयारीसाठी येत होता. दोघांची येथे ओळख झाली. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधली. काढलेला तिचा फोटो त्याने एडिट केला.आणि हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या भाड्याच्या रुममध्ये, कॉलेजजवळ, खाजगी क्लासजवळ, चहाच्या हॉटेलजवळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी या अल्पवयीन मुलाने जुलै 2022 पासून मार्च 2023 च्या दरम्यान तिच्यावर जबरीने अत्याचार केला. पीडितेने बुधवार 3 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झाला. तपास सपोनी मिरा देशमुख करीत आहेत.
पालकांनी सतर्क होणे आवश्यक
अल्पवयीन मुलांचे तारुण्यात चुकीचे पाऊल पडणे ही गंभीर बाब आहे. अल्पवयीन मुलाने फोटो व्हायरल करण्याचे सांगत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला. पालकांच्यादृष्टीने हा प्रकार चिंताजनक आहे. पाल्यांबाबत अधिक सजग होणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालय किंवा क्लासेस याठिकाणी पालकांनी अधूनमधून जावून पाल्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे. चुकीच्या गोष्टीना क्षमा नसते, हे सुध्दा पालकांनी लक्षात घ्यायला हवे.
– डॉ.विशाल जयस्वाल, पोलीस निरीक्षक – जिल्हापेठ पोलीस ठाणे