रस्त्यावर मुरुम टाकला, ग्रामपंचायतीला पडला विसर, शेवटी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

लोहारा, ता. पाचोरा : येथे आठ दिवसांपासून मुरमाचे ढीग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी न पसरविल्याने ते रस्त्यातच पडून  होते. यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला. शेवटी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हातात पावडा घेऊन हा मुरूम स्वतः पसरविला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील ग्रामपंचायतच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे नुकतीच समस्यांचा पाढा वाचत तक्रार केली होती. यावर ना .महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार  १४ ऑगस्ट  रोजी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी  अनिकेत पाटील , पाचोरा गटविकास अधिकारी स्नेहल शेलार,विस्तार अधिकारी राजेंद्र धस यांनी लोहारा ग्रामपंचायतला  भेट देत सरपंच अक्षय जैस्वाल, ग्राम विकास अधिकारी गजानन काळे यांची झाडाझडती घेतली.

यानंतर देखाव्यासाठी रस्त्यावर  मुरूमाचे ढीग टाकण्यात आले. परंतु, काही भागात मुरूम टाकला याचाच लोहारा ग्रामपंचायतीला विसर पडला. मुरूमाचे ढिग पसरवण्यासाठी आठ दिवस उलटूनसुद्धा ग्रामपंचायतीचे कोणी कर्मचारी या ठिकाणी आले नाही.

प्राथमिक आरोग्य केंद्र ते श्री समर्थ नगर या रस्त्यावरून शेतकरी, मजूर ट्रॅक्टर, बैलगाडी, मोटारसायकलीने प्रवास करतात. तसेच बैठकीच्या श्रवणासाठी ऑटोरिक्षा, शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दोन ते तीन स्कूल बस रोज या ठिकाणावरून ये जा करत असतात. एवढी वर्दळ असतानाही गाव कारभाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिले नाही.

परंतु , ग्रामपंचायतीने दर्शनी भागाची डागडुजी केली, इतर कामे सोडून दिली व काही कामे अर्थवट सोडून दिली. त्यातीलच एक काम म्हणजे श्री बैठकीकडे व शाळेत जाणारा रस्ता. या ठिकाणचे मुरुमाचे ढिग आठ दिवस झाले जसेच्या तसे पडले होते. वाहनधारकांना मोठ्या कसरतीचे वाहने चालवावे लागत आहे.

शेवटी श्री समर्थ नगर येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी हातात पावडा घेऊन स्वतः पसरविला मुरूम. लोकेश काकडे, यश भिवसने व भावेश माळी या विद्यार्थ्यांनी हातात पावडे घेऊन स्वयंस्फूर्तीने हा मुरुम पसरविला. या प्रकारामुळे ग्रामस्थांकडून ग्राम पंचायतीचा तिरस्कार तर शाळकरी मुलांचे कौतुक होत आहे.