---Advertisement---
वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजाला विशेष महत्त्व दिले जाते. घरात येणारी-जाणारी ऊर्जा सर्वप्रथम याच प्रवेशद्वारातून आत येते, असे मानले जाते. आपण बाहेर कुठेही जाऊन परत घरी येतो, तेव्हा आपण फक्त स्वतःच येत नाही, तर त्या ठिकाणची ऊर्जा देखील आपल्या सोबत येते, अशी धारणा आहे. ही ऊर्जा सकारात्मकही असू शकते आणि नकारात्मकही. जसकी एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मनात प्रसन्नता निर्माण होते आणि ती सकारात्मक भावना घरातही पोहोचते. उलट, नकारात्मक वातावरण असलेल्या ठिकाणाहून आल्यास त्याचा परिणाम घराच्या वातावरणावर होऊ शकतो, असे सांगितले जाते.
घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य लाभते, अशी समजूत आहे. मात्र नकारात्मकता वाढल्यास तणाव, आर्थिक अडचणी आणि अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा नकारात्मक ऊर्जेला घराच्या उंबरठ्यावरच थांबवण्यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रात सुचवले आहेत.
त्यामध्ये स्वस्तिक चिन्हाला विशेष स्थान आहे. पूजाविधीमध्ये वारंवार काढले जाणारे हे चिन्ह शुभ मानले जाते. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्यास घरात अपायकारक ऊर्जा प्रवेश करत नाही, असा समज आहे. त्यामुळे अनेकजण प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावण्यास प्राधान्य देतात.
तसेच सण-उत्सवांच्या काळात दरवाजाला तोरण लावण्याची परंपरा आहे. अंब्याची पाने किंवा ताज्या फुलांचे तोरण लावणे शुभ मानले जाते. मात्र तोरणातील पाने किंवा फुले कोमेजल्यानंतर ती त्वरित बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. कृत्रिम फुलांऐवजी नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, अशीही सूचना केली जाते.
मुख्य दरवाजाजवळ पायपुसणी ठेवण्यालाही महत्त्व दिले जाते. घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय स्वच्छ करण्याबरोबरच नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते, अशी धारणा आहे. सजावटीसाठी विविध आकारांच्या पायपुसण्या उपलब्ध असल्या तरी वास्तुशास्त्रानुसार आयताकृती पायपुसणी अधिक योग्य मानली जाते.
टिप : वरील लेखात दिलेली माहिती उपलब्ध स्रोताच्या आधारावर देण्यात आली आहे. तरुण भारत लाईव्ह कुठल्याही दाव्याची पुष्टी करत नाही, तसेच अंधश्रद्धेच समर्थनही करत नाही









