Plane Crash : अर्ध विमान जळून खाक, १७९ जणांचा मृत्यू, बचावले दोनच प्रवासी

दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी झालेल्या भयंकर विमान दुर्घटनेने देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरताना विमान घसरले आणि बाउंड्री फेसला धडकल्यामुळे त्याला आग लागली. या दुर्घटनेत सुमारे १७९ जणांचा मृत्यू झाला असून, केवळ दोनच प्रवासी बचावले असल्याची माहिती समोर आली आहे.

दुर्घटनेचा उलगडा

विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांनी सांगितले की, दुर्घटनेआधी एका प्रवाशाने संदेश पाठवून विमानाच्या अडचणीची माहिती दिली होती. संदेशात लिहिले होते की, “पक्षी विमानाच्या पंख्यात अडकला आहे आणि यामुळे लँडिंगमध्ये अडथळा येत आहे.” या घटनेमुळे प्रवाशांच्या कुटुंबियांचा आक्रोश विमानतळावर पाहायला मिळाला.

काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

दक्षिण कोरिया टाइम्सच्या अहवालानुसार, प्रवाशांनी दिलेल्या संदेशात हास्यविनोद करत “माझे मृत्यूपत्र तयार करू का?” असा प्रश्नही विचारला होता. परंतु हा विनोद नंतर एक भयंकर सत्य ठरला. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये धावपट्टीवरून विमान घसरताना आणि बाउंड्री फेसला धडकताना स्पष्टपणे दिसत आहे.

प्राथमिक तपास आणि संभाव्य कारण

प्राथमिक चौकशीत असे समजते की, पक्षी विमानाच्या पंख्याला धडकल्याने लँडिंग गिअर फेल झाले आणि ही दुर्घटना घडली. अपघातानंतर दक्षिण कोरियन सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दक्षिण कोरियावर शोककळा

या दुर्घटनेमुळे संपूर्ण दक्षिण कोरिया शोकमग्न झाला आहे. प्रवाशांच्या कुटुंबियांचा आक्रोश आणि गमावलेल्या लोकांच्या आठवणींनी विमानतळाचा परिसर भरून गेला आहे. विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे.