नागपूर : पंतप्रधान मोदी रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय केशव कुंज येथे पोहोचले. पंतप्रधानांनी पहिल्यांदाच आरएसएस मुख्यालयाला भेट दिली आहे. पंतप्रधानांसोबत आरएसएस प्रमुख मोहनजी भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते .
पंतप्रधानांनी आरएसएस मुख्यालयातील स्मृति मंदिराला भेट देऊन आरएसएस संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांना श्रद्धांजली वाहिली.
यानंतर, ते दीक्षाभूमीवर गेले आणि संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी आरएसएस कार्यालयाजवळ आहे. येथेच डॉ. भीमराव आंबेडकर यांनी १९५६ मध्ये त्यांच्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी गौरवोद्गार काढले. स्वयंसेवकांना सेवा, संस्कार आणि साधना या मूल्यांमुळेच प्रेरणा मिळते, असेही मोदींनी म्हटले.
राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज १०० वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हे साधारण वटवृक्ष नाही. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे, असे मोदींनी म्हटले.
नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या रूपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होत आहे. माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे. आता नवीन परिसरामुळे या सेवाकार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या रूपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होत आहे. माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे. आता नवीन परिसरामुळे या सेवाकार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.