PM Narendra Modi : अर्बन नक्षलच काँग्रेस चालवतंय, पंतप्रधान मोदींचा आरोप

PM Narendra Modi : काँग्रेसला दलितांना दलित ठेवायचं आहे. गरीबांना गरीब करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल चळवळ काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच काँग्रेसने बंजारा समाजाचा कायम अपमान केला. त्यांना समान वागणूक दिली नाही, त्यामुळे काँग्रेस पासून सावध राहा असा सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी पोहरादेवी येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “बंजारा समाज पिढ्यानुपिढ्या भारताची संस्कृती आणि परंपरा जपत आला आहे. स्वातंत्र्याच्या युद्धावेळी इंग्रजांनी या संपूर्ण समाजालाच गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. परंतू, स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाला योग्य न्याय देणं ही देशाची जबाबदारी होती. पण त्यावेळी काँग्रेस सरकारने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहातून वेगळं केलं.”

“स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षावर ज्या परिवाराने कब्जा केला त्यांचे सुरुवातीपासूनच परदेशी विचार राहिले आहेत. इंग्रजांप्रमाणेच काँग्रेससुद्धा दलित, मागास आणि आदिवासींना समान वागणूक देत नाहीत. त्यांना वाटतं की, भारतावर एकाच परिवाराचं वर्चस्व असायला हवं. त्यामुळे काँग्रेस सरकारने बंजारा समाजाचा कायमच अपमान केला.

बंजारा समाजाला आम्ही सन्मान दिला

मात्र, एनडीए आणि भाजप सरकार या समाजाची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी काम करत आहे. विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा, तांडा समृद्धी अभियान सुरु केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोहरादेवी तीर्थस्थळाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. पण महाविकास आघाडीच्या सरकारने या कामाला ब्रेक लावला. त्यानंतर पुन्हा महायूती सरकार आल्यानंतर हा विकास पुन्हा सुरु झाला. या योजनेवर ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या तीर्थक्षेत्रामुळे आजूबाजूच्या भागांचाही विकास होईल,” असे ते म्हणाले.

ड्रग्ज रॅकेटचा मुख्य आरोपी काँग्रेसचा

दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्या रॅकेटचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला आहे. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. या ड्रग्ज रॅकेटच्या त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला सावध राहून इतरांनाही सावध करायचं आहे. कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी शेतकऱ्यांना गरीब केले आहे. परंतू एनडीए सरकार शेतकऱ्यांना सशक्त बनवत आहे. आज ९,२०० किसान उत्पाद संघाचे ( FPO ) लोकार्पण केले आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य केले आहे. महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद केल्या आहेत. तसेच पीएम किसान योजनेची कॉंग्रेस नेहमीच चेष्टा करीत आली आहे अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

अर्बन नक्षलच काँग्रेस चालवत आहे

काँग्रेसला दलितांना दलित ठेवायचं आहे. गरीबांना गरीब करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल चळवळ काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्याचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. सोबत मिळून लढायचं आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.