जळगाव : स्वातंत्र्याच्या ७० वर्षात जितकं काम झालं नाही तितकं काम आम्ही १० वर्षांमध्ये करून दाखवलं. २०२४ पूर्वी फक्त २५ हजार कोटी महिलांना कर्ज म्हणून देण्यात आलं होतं. गेल्या १० वर्षात जवळपास ९ लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे गावातील महिला सन्मानाने जगत आहे. महिलांना मदत केल्याने परिवाराचं भाग्य बदलतं, असं म्हणत पीएम मोदींनी जळगावातून ‘लखपती दीदी’ कार्यक्रमातून विरोधकांना लक्ष्य केले.
ते पुढे म्हणाले की, हा फक्त ट्रेलर होता. आता आणखी काम महिलांसाठी करायचं आहे. सरकार महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मदत दिली जात आहे. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देत आहोत. कृषी सखी येत्या काळात गावागावात दिसतील. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल, असं पीएम मोदी म्हणाले.
नेपाळ दुर्घटनेतील भाविकांना श्रद्धांजली
भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ, काठमांडू येथे बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांना आणि जखमींना मदतीसाठी सरकारने सर्वोतोपरी सहकार्य केले. केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे वायू सेनेच्या विशेष विमानाने मृतदेह घेऊन आल्या. आम्ही सर्व कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली.