भुसावळात 97 व्यक्तींवर पोलिसांची कारवाई

तरुण भारत लाईव्ह I भुसावळ : उपविभागात 31 डिसेंबर 2022 चे रात्री 9 ते 1 जानेवारी 2023 च्या पहाटे 2 वाजेपर्यंत भुसावळ उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण उपविभागामध्ये पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आलेला होता. 7 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. पोलीस पेट्रोलिंग व फिक्स पॉईंट लावण्यात आलेले होते. 97 व्यक्तींवर मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आलेली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत हे आनंदाने व उत्साहाने करता यावे, नवीन वर्षाच्या स्वागताला कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आलेला होता. कारवाईदरम्यान पोलिसांना 49 वाहन चालक दारूच्या नशेत वाहन चालवताना मिळून आले. अशा वाहनचालकांवर पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केलेली आहे. तसेच तीन अल्पवयीन मुले नशेत वाहन चालवताना मिळून आले. त्यांची वाहने भुसावळ शहर वाहतूक शाखेमध्ये जमा करण्यात आलेली आहे. त्यांच्या पालकांवर कारवाई करून न्यायालयात खटला पाठवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 खाली 13 व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रिपल सीट, विना नंबरप्लेट वाहनचालक, रेस ड्रायव्हिंग करणारे वाहनचालक अशा वेगवेगळ्या 97 व्यक्तींवर मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक पडघन, पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये, सहायक पोलीस निरीक्षक वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी व पोलीस स्टेशन बाजारपेठ, पोलीस स्टेशन शहर, पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा भुसावळ यांच्या सर्व अंमलदारांनी ही कारवाई केली.