पाचोरा : तारखेडा येथे भरदिवसा पाचोरा पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. दोन जुगारींसह ३७ हजारांची रोकड, चार दुचाकी, ५ मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील तारखेडा खुर्द येथे ३ रोजी दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास आरोपी अर्जुन भीमा नाईक, प्रवीण उर्फ पिंटू उत्तम गायकवाड, विजय मधुकर नाईक (सर्व रा. तारखेडा ता. पाचोरा) यांनी दिलीप रामदास पाटील (रा. तारखेडा) यांचे शेतात बंद पत्र्याचे शेडमध्ये झन्नामन्ना नावाचा जुगार खेळण्याकरिता आपसात संगनमत करून जुगाराचा क्लब सुरू केला होता. याठिकाणी संशयित राहुल सुरेश पाटील (वय २९) (रा. नगरदेवळा). विकास पृथ्वीराज पाटील (वय- ३६) (रा. निंभोरा) या दोघांनी स्वतःच्या फायद्यासाठी झन्नामन्ना नावाचा जुगाराचा खेळ मांडला होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत २ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोघांना नंतर नोटीस देऊन सोडण्यात आले.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात पथकातील सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंपी, योगेश अरुण पाटील, विनोद बेलदार यांनी कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.