Police-suicide-stress जितक्या अपेक्षा कमी त्या प्रमाणात मनाला अधिक शांतता लाभते. पण प्रत्यक्षात पृथ्वीतलावरील माणूस अपेक्षांच्या चक्रव्यूहात फसला आहे. त्याने कुवतीपेक्षा जास्त अपेक्षा करणे सुरू केले आहे. येथेच सर्व गणित चुकत आहे. याच चुकलेल्या गणितामुळे मग मनाचे संतुलन बिघडते आणि माणूस तणावात राहताे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद स्वीकारून सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी 365 दिवस आणि चाेवीस तास कार्यरत पाेलिस यंत्रणेतील बहुतांश कर्मचारी, अधिकारी चक्क तणावात वावरत आहेत. याच तणावात आलेल्या काही पाेलिसांनी चक्क आत्महत्येचा साेपा मार्ग निवडला. वस्तुत: पाेलिस म्हणजे अनेकांसाठी तारणहार आहेत. मग हेच तारणहार, सज्जनांसाठी संकटमाेचकांनी आत्महत्येचा साेपा मार्ग का निवडला. ज्यांनी आत्महत्या केली ते कर्जाच्या विळख्यात अडकले हाेते. तर काहींनी शेअर्स बाजारात गुंतवणूक केल्याचेही समाेर आले आहे. एकाने भूखंड खरेदी केला, पण विक्रीपत्रासाठी पैशाची जुळवाजुळव न झाल्याने त्याने आत्महत्या केली.
Police-suicide-stress तणावात असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांना त्यावेळी ही कारणे खराेखरच महत्त्वपूर्ण वाटली असतील. पण त्यावर आत्महत्या हाच उपाय नव्हता. तसे पाहता कर्ज काढणे ही एक जड वस्तू डाेंगरमाथ्यावरून खाली लाेटून देण्याइतकं साेपे आहे. परंतु ते कर्ज फेडणे म्हणजे तीच वस्तू खालून डाेंगरमाथ्यावर वाहून नेण्याइतके कष्टप्रद आहे. याची जाणीवच अनेकांना नाही. समजा ते त्यांना माहीत असेल तर त्यांना वाटते की, सरकारी नाेकरी आहे ना, कुठूनही जुगाड करूआणि कर्ज फेडून टाकू. पण समाेर भविष्यात आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, याचे त्यांना भानच नसते. अनेकांना श्रीमंती मिरवण्याचीही हाैस असते. मात्र श्रीमंत हाेण्यापेक्षा गुणवंत हाेण्याचा प्रयत्न करायला हवा, तीच बाब ते कटाक्षाने टाळतात. पाेलिस खात्यासह सरकारी नाेकरीत असलेले 100 पैकी 99 जण आज पैशाच्या मागे धावत आहेत. चांगला सातवा वेतन आयाेगाचा पगार मिळत असतानाही एवढी पैशासाठी हाव का? याचेही आत्मचिंतन ते करायला तयार नाहीत. एक सांगताे, पैशाचे नाव अर्थ पण ताे करताे माेठा अनर्थ. हाच फॉर्म्युला ते विसरल्याने त्यांच्या आयुष्यात तणावाचा शिरकाव झाला आहे. शिवाय घरात विनाकारणचे खर्चही त्यांनी वाढवून ठेवले आहेत.
Police-suicide-stress कुटुंबीयांनीही आपल्या अपेक्षा पाेलिस खात्यात कार्यरत पित्यावर, मातेवर अक्षरश: लादल्या आहेत. त्याचीच प्रतिपूर्ती करताना संबंधितांची दमछाक हाेत आहे. पूर्वजांनी आपल्याला बचतीचा मंत्र सांगितला. ताे आपण अंधानुकरणाच्या नादात पायदळी तुडविला. शिवाय खर्चही वाढवण्यावर आपणच भर दिला. एक वाहन असताना आणखी गाड्या घेत आपण इंधनासह कर्जाचा हप्ता वाढविला. आता हेच पाहा ना. मनाेरंजनासाठी भारत सरकारची डीटीएच फ्री टू एअर ही यंत्रणा कार्यरत आहे. पण आपण खाजगी कंपन्यांच्या मागे लागून दर महिन्याला पाचशे-हजार रुपयांचे पॅक घेऊन काय साध्य करीत आहाेत. माेबाईलची खूप गरज असल्याचा आव आणत त्यातील नेटपॅकवर हजाराे रुपयांची उधळपट्टी घराघरात सुरू आहे. थाेडाफार बदल झाल्याचे पाहताच वारंवार महागडे हॅण्डसेट विकत घेतले जातात. घरात आईने आवडीची भाजी न केल्यास पटकन बाहेरून खाद्यपदार्थ बाेलावले जातात. हे सर्व छाेटे खर्च वाटतात, पण जेव्हा त्यांची गाेळाबेरीज केली जाते, तेव्हा ताे आकडा लाखांत जाताे.
Police-suicide-stress मग डाेळे उघडतात पण ताेपर्यंत वेळ हातून गेलेली असते. याच स्वरूपातील अनेक खर्च सहजतेने टाळता येतात. मात्र ते न करता अधिक खर्च वाढविले जातात. कुटुंबातील सदस्यही कमावणाऱ्यांचा विचार करीत नाहीत. तसे पाहता मुला-मुलींनी येणारा पैसा किती, जाणारा किती आणि बचत नेमकी किती व्हावी याची गाेळाबेरीज करायला हवी. प्रत्येक गाेष्ट कमावणाऱ्यानेच करावी असा कुठे नियम आहे का? उत्तम व्यवहारे धन घ्यावे । उत्तम कार्यासाठी लावीत जावे । जेणे परस्परांचे कल्याण व्हावे । तैसेचि करावा व्यवहार ।। ही शिकवण आपल्याला राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनी दिली. मग त्या शिकवणीचे काय? जेव्हा घराघरात असा विचार करून बचतीची सवय सर्वांना लागेल, तेव्हा कमावणारा तणावात येणार नाही. जेव्हा तणावच संपेल तेव्हा त्याच्या डाेक्यात आत्महत्येचा विचारच येणार नाही. आपाेआपच गरजा कमी हाेतील अन् ताेही पैशाच्या मागे धावणार नाही. जेव्हा ताे तणावात नसेल तेव्हाच कर्तव्याच्या माध्यमाने सर्वाेत्तम अशी लाेकसेवा करेल. आपल्याला सर्वाेत्तम लाेकसेवा करणारा आणि विशेष म्हणजे तणावमुक्त निराेगी सुदृढ मनाचा पाेलिस दादा हवा आहे, नाही का?