---Advertisement---
जळगाव : नाशिकनंतर आता जळगावात देखील सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडवली आहे.
इम्रान भिस्ती असे या तरुणाचे नाव असून सोशल मीडियावर रीलद्वारे भाईगिरी करण्याचा प्रयत्न या तरुणाच्या अंगलट आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून भाईगिरीचा व्हिडिओ नंतर आता इमरान भिस्ती या तरुणाने रील बनवून माफी मागितली आहे.
जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इम्रान भिस्ती या तरुणाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला घरुन ताब्यात घेतले.
पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला खाक्या दाखवताच त्याने माफी मागणारा व्हिडिओ बनवला. इम्रान विरुद्ध प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे.
पोलिसांचा इशारा
दरम्यान, भाईगिरी दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अशा प्रकारच्या व्हिडिओंद्वारे समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना दिला आहे.
---Advertisement---