धरणगाव : गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कमुळे चोरीचा मोठा प्रयत्न टळला. मात्र, चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
पोलिसांचे वाहन रविवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना चिंतामण मोरया परीसरातील एका बंद घरात चोरटे शिरल्याची माहिती मिळाली. गस्तीवरील वालदार संजय सूर्यवंशी व पोलिस नाईक समाधान भागवत यांनी लागलीच धाव घेतली. चिंतामणी मोरया नगरात मंदिराच्या बाजूलाच शिक्षक मनोज गुजर यांच्या घरात चोरटे शिरले होते परंतु पोलिसांची चाहूल लागताच दोन चोरांनी कंपाउंडमधून उड्या मारून पळ काढला. हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिस नाईक समाधान भागवत यांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेताच घराच्या मागच्या बाजूने आणखी तीन चोरटे देखील पळून गेलेत.
पोलिसांनी शिट्या वाजवल्या, अनेकांना आवाज दिला. परंतू मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे घराबाहेर कुणीही आले नाही. दोघं पोलीस कर्मचार्यांनी चोरट्यांच्या दिशेने पाठलाग सुरु केला. रेल्वे स्टेशनकडील कपाशीच्या शेतात दूरपर्यंत चोरांचा पाठलाग केला. परंतू ते पळून जाण्यात यशस्वी झालेत. उर्वरित तीन चोरेटे शहराच्या दिशेने पळून गेलेत.
विशेष म्हणजे, धरणगाव पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न असफल झाला. दरम्यान, दोघं पोलीस कर्मचार्यांचे गावात कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी देखील दोघं कर्मचार्यांचे अभिनंदन केले.