politic : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव मतदारसंघात यंदा चुरस

politic : जळगाव

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी व ‌‘लॉबिंग’ केले जात आहे. यावेळी उमेदवारीसाठी जिल्हा दूध उत्पादक संघ,  राज्य मार्केटींग फेडरेशनचे संचालक रोहित निकम, विद्यमान खासदार उन्मेश पाटील, उद्योजक अविनाश पाटील हे प्रमुख दावेदार आहेत.

लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. देशात प्रमुख पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपतर्फे उमेदवारीसाठीच अनेक जण इच्छूक आहेत. हा मतदारसंघ गेल्या अनेक पंचवार्षिकपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपकडून ऐनवेळी उमेदवारी मिळालेले उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचा दारूण पराभव केला होता. घरकुल घोटाळ्यात देवकरांना शिक्षा झाली व नंतर त्यांची सुटका झाली या मुद्यावरून त्यावेळी बरीच टीका झाली व त्याचा फटका देवकरांना बसला होता. पाच वर्षे उलटली आता 2024 च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाकडे हा मतदारसंघ जाण्याची शक्यता आहे.

 

मोर्चे बांधणी 

भाजप विरोधी गटाकडे जास्त उमेदवार नाहीत. निवडणूक लढविणे हीदेखील ‌‘कसरत’ठरणार आहे, हे स्पष्ट असल्यामुळे उमेदवारीसाठी फारसे कोणी इच्छूक नाही, तर भाजपकडून उमेदवारीसाठी याविरूद्ध परिस्थिती आहे. उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान खासदार प्रयत्नशील आहेत. मात्र ऐनवेळी काही बदल होण्याची शक्यता चर्चेत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र व पक्ष संघटन कौशल्यात वाकबगार असलेले रोहित निकम कंबर कसून आहेत. यासह आमदार मंगेश चव्हाण हे स्वत: या निवडणुकीसाठी फारसे उत्सुक नसले तरी त्यांनाही संधी दिली जाऊ शकते. उद्योग क्षेत्रात लौकिक असलेले व रा.स्व. संघाचे स्वयंसेवक विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील-जाधव यांनीही बऱ्यापैकी मोर्चेबांधणी केलेली दिसते. मतदारसंघात संपर्क वाढविण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद लाभला आहे. यासह विविध संस्था, ग्रामपंचायती, उद्योजक वर्गाशी ते सतत संपर्क ठेऊन आहेत. तसेच पाचोऱ्याचे डॉ.अमोल शिंदे यांचेही नाव चर्चेतील यादीत आहे.

 

इच्छुकांची नावे दिल्लीला

भाजपकडून इच्छूक असलेल्यांची नावे दिल्ली दरबारी गेली असल्याचे समजते तर इंडिया आघाडीच्या बैठकीत या गटाचा उमेदवार ठरेल. त्यामुळे सध्यास्थितीत केवळ चर्चाच जास्त आहेत तसेच इच्छुकांकडून केवळ गाठी-भेटी, कार्यक्रम व संपर्क अभियान सुरू असल्याचेच लक्षात येते.

 

भाजपकडून उमेदवारीसाठी उड्या

या मतदारसंघात भाजप युतीकडून उमेदवारीसाठी उड्या पडत आहेत.  त्यात इच्छुकांमध्ये विद्यमान खासदार उन्मेश पाटील, जिल्हा दूध संघाचे तसेच राज्य मार्केटींग फेडरेशनचे संचालक तथा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, आमदार मंगेश चव्हाण उद्योजक तथा जळगाव येथील विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश अरूण पाटील-जाधव, डॉ.अमोल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे, तर इंडिया आघाडीकडून ही जागा शिवसेनेना उबाठा गटाकडे जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात डॉ. हर्षल माने (पारोळा), या गटाचे नेते गुलाबराव वाघ यांची नावे चर्चेत आहेत.