political earthquake : महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी तेव्हापासून आतापर्यंत एकच नाव.. एकनाथ संभाजी शिंदे

political earthquake :  महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी तेव्हापासून आतापर्यंत एकच नाव होतं, ते म्हणजे, एकनाथ संभाजी शिंदे. जाणून घेऊ या सर्वात प्रबळ नेत्याबाबत काही गोष्टी…

रिक्षाचालक ते मंत्री असा प्रवास
9 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सामान्य शेतकरी कुटुंबात एकनाथ शिंदेंचा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातील डोंगराळ जावळी तालुक्यात त्यांचं गाव असून ते मराठा समाजातील आहेत. एकनाथ शिंदे यांचा जन्म साताऱ्यात झालेला असला, तरी त्यांचं अकरावीपर्यंतचं शिक्षण ठाण्यातच झालं. त्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ठाण्यातीलच वागळे इस्टेट परिसरात रागून त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. ऑटो रिक्षाचालक असणाऱ्या शिंदेंनी ऐंशीच्या दशकात शिवसेनेत प्रवेश घेतला. सामान्य शिवसैनिक म्हणून शिंदेंनी शिवसेनेतील आपला प्रवास सुरू केला.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची गणना होते. लोकसभा असो की महापालिका निवडणुका, ठाण्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी शिंदेंनी आपलं आयुष्य वेचलं. ठाण्यात शिवसेना रुजवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पक्षाला मोलाची साथ दिली. एकनाथ शिंदेंचा शिवसेनेतील प्रवास अगदी सामान्या कार्यकर्त्यापासून झाला. ठाण्यातील प्रभावी नेते आनंद दिघे यांचं बोट धरून शिंदे पुढे सरसावले.

सर्वात आधी एकनाथ शिंदे 1997 मध्ये ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 2001 मध्ये महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. याशिवाय तीन वर्ष शक्तिशाली स्थायी समितीचे सदस्य होते. दुसर्‍यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी ते आमदार झाले असले तरी 2000 सालानंतरच शिवसेनेनं राजकीय उंची गाठली. ठाणे परिसरातील शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद दिघे यांचं 2000 साली निधन झालं. त्यानंतरच एकनाथ शिंदे ठाण्यात पुढे सरसावले. पुढे 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पक्षात बढती मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील आलेख तर आणखीनच वाढलाच शिवाय ठाकरे कुटुंबाशी जवळीकही वाढली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी एकनाथ ठामपणे उभे राहिले.

एकनाथ शिंदे चौथ्यांदा आमदार
मातोश्रीच्या जवळच्या नेत्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचं नाव पहिलं होतं. एकनाथ शिंदे हे 2004 मध्ये ठाण्यातील कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. शिंदे 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले, त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्येही ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे देखील शिवसेनेच्या तिकिटावर कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष ते आमदार, मंत्री असा प्रवास केला.

2019 विधानसभा निवडणुकीत शिंदेंचा विजयाचा चौकार
2019 च्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिंदेंनी विजयाचा चौकार लगावला होता. ठाण्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 89 हजार 300 मताधिक्यानं आपला गड कायम ठेवलेला. त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा पराभव करून विजयाचा चौकार साधला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिंदेंनी निर्णायक आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत त्यांना चार हजार 230 मतं मिळाली. त्यावेळी घाडीगावकर यांना 898, तर मनसेच्या महेश यांना 555 मतं मिळालेली. वंचित आघाडीचे उन्मेष बागवे हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना अवघी 231 मतं मिळाली. पुढे 27 व्या फेरीपर्यंत शिंदे यांनी आघाडी कायम राखलेली. एक लाख 13 हजार 497 मतं मिळवून ते विजयी झाले. पराभूत घाडीगावकर यांना 24 हजार 197 मतं मिळाली. तर, मनसेच्या कदम यांना 21 हजार 513 मतं मिळाली.

2019 मध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील प्रबळ मंत्र्यांपैकी एक होते, त्यामुळे त्यांचं राजकीय कौशल्य सर्वश्रुत होतं. 2019 ची निवडणूक जिंकून जेव्हा ते चौथ्यांदा विधानसभेत पोहोचले, तेव्हा शिवसेना आणि त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष भाजप यांच्यात परिस्थिती बिघडली. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड होणार असल्याच्या चर्चा होत्या. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं शिंदेंचं नाव
2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात फक्त शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं होतं. हे वचन मी बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं, असंही उद्धव म्हणाले होते. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव सर्वात पुढे होतं. त्यावेळी त्यांच्या नावावर शिवसेनेचे आमदार आणि नेतेही तयार होते, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं त्यावर एकमत नव्हतं. अखेर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले.

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आल्यानं एकनाथ शिंदे यांच्या इच्छा धुळीस मिळाल्या. मात्र, त्याआधीच एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्स लावण्यास सुरुवात केली होती. एकनाथ शिंदे महाराष्ट्रात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या बाजूनं होतं, मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मौन बाळगलं. अशा स्थितीत त्यांना उद्धव सरकारमध्ये नगरविकासासारखं मोठं मंत्रीपद देण्यात आलं, त्यावरून त्यांच्या राजकीय उंचीचा नक्कीच अंदाज बांधता येईल.

आघाडी सरकार आल्यापासून ओढवली नाराजी
एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, मंत्री आणि आमदारांविरोधात बंडखोरी करून ते गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये गेले असं एका रात्रीत घडलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज होते. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास वाटत होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या हजेरीनंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मंत्रिमंडळात प्रबळ असूनही नाराजी वाढली
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे सर्वात शक्तिशाली मंत्री होते, मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ते हळूहळू बाजूला होत गेले. उद्धव मंत्रिमंडळात शक्तिशाली मंत्री असूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ न शकल्यानं नाराजी वाढतच गेली. त्यानंतर त्यांना त्यांच्या विभागाशी संबंधित निर्णयांपासून दूर ठेवलं जात होतं. आदित्य ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय त्यांच्या विभागातील नगरविकास कामात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंनी वारंवार केली. पक्षात आपल्यासाठी जागा उरणार नाही हे शिंदे यांना समजलं होतं आणि अशा परिस्थितीत त्यांनी मोठी तयारी सुरू केली होती.

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले असतानाही त्यांनी जोपासलेली इच्छा विसरू शकले नाही. अशा परिस्थितीत एमव्हीए सरकारच्या काळात त्यांच्या नाराजीच्या बातम्याही वेळोवेळी येत होत्या. एकनाथ शिंदे राजकीय संधीची वाट पाहत होते आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांना ही संधी मिळाली. शिवसेनेच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं महाविकास आघाडीला एक जागा गमवावी लागली. त्यानंतरचा 26 आमदारांसह मुंबईतून जाऊन गुजरात गाठण्याचा एकनाथ शिंदेंचा हा खेळ ठाकरेंनाही समजू शकला नाही.

दरम्यान, 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे यांनीही पुढाकार घेतला होता. एकेकाळी शिवसेनेसाठी जोरदार लढा देणारे एकनाथ शिंदे पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र आमदार अपात्रतेच्या निकालामुळे.

आता आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्याच जाहीर होणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर काय? नवा मुख्यमंत्री कोण असणार? की शिवसेनेतील बंडाप्रमाणेच यंदाही शिंदे महाशक्तीच्या मदतीनं पत्ते फिरवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.