Political News : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काही महिन्यात होणार आहेत. या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिका जिंकण्यासाठी नवनवीन डावपेच आखले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नाशिकमधील उप महानगरप्रमुख बाळा दराडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी धमकी दिली आहे.
राहुल गांधी यांनी दोनवेळा सावरकरांबाबत काही अपशब्द वापरले, त्यांन माफीवीर म्हणून संबोधलं. त्याबाबत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावले आहे. पण आता नाशिकमधील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे.
त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यालवर दगडफेक करू. आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, असा थेट इशारा दराडे यांनी दिला.
सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू…जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही असंही बाळा दराडे म्हणाले.
यशोमती ठाकूर यांचा ठाकरे गटाला इशारा
काँग्रेस नेते राहुल गांधींना अशा शब्दात बोलणं कोणीही खपवून घेणार नाही, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या. राहुल गांधींना तुम्ही हात लावून दाखवा..असा इशारा देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले…
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत कोणतेही अपशब्द वापरलेले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी जे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत, तेच सगळ्यांसमोर ठेवण्याचं काम केले आहे, असं महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यामुळे जर कोणी अशा शब्दात धमक्या देत असतील तर ते दुर्दैवी आहे, राहुल गांधींना कोणी अशा धमक्या देत असल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.