महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते, डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

नागपूर : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते.

संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी डॉ. बंग यांची प्रकट मुलाखत पार पडली. या मुलाखतीत डॉ. बंग म्हणाले, दारूने देशाचे मोठे नुकसान केले आहे. महाराष्ट्र तर मद्यराष्ट्र झाले आहे. दरवषी आपल्या राज्यात २ लक्ष कोटींची दारू पिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दारू पिणार्‍यांना अंनिसच्या ताब्यात द्या, कारण ते दारू आरोग्याच्या हिताची आहे, असे सांगून अंधश्रद्धा पसरवताहेत, असा खोचक सल्लाही डॉ. बंग यांनी सरकारला दिला.

वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस असून संध्याकाळी दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेते, कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांचा मुक्त संवाद होणार आहे. दरम्यान, वर्ध्यातील सर्कस मैदानावर दोन दिवसीय अखिल भारतीय विद्रोही मराठी संमेलन आजपासून सुरू होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेत्री रसिका आगाशे असून, रविवारी विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.