पूजा खेडकर प्रकरणावर! आमदार पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : खेडकर कुटुंबाशी माझा कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार पंकजा मुंडेंनी दिली आहेत. पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाला खेडकर कुटुंबाने देणगी दिल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, आता यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण देत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मानहानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “माझ्यावरच्या आरोपांमुळे मी अत्यंत व्यथित झाली आहे. मी दोन दिवसांपासून माझ्या लोकांच्या आनंदात होते. हा आनंद पाहवला न गेल्याने हे प्रकरण माझ्याशी जोडण्यात आलं. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकरिता मी त्यांचा एक रुपयाही घेतलेला नाही. मी एवढीही मोठी नाही की, एखाद्या व्यक्तीला बोगस पद्धतीने आयएएस अधिकारी बनवू शकते. त्यामुळे राजकारणी आणि समाजकारणी म्हणून मी यावर कायद्याने पाऊल उचलणार असून इथून पुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. पाच वर्ष माझ्याविरोधात अशी कुठलीच बातमी मला दिसली नाही. आता मला विधानपरिषद मिळल्याने असे प्रकार सुरु असू शकतात.”

“मी अशा गोष्टी का करु? हे प्रकरण माझ्याशी जोडण्याचं कारस्थान आहे, असं मला वाटतं. कायद्याने खेडकरांचा तपास होईल. ते चुकले असतील तर शिक्षा होईल आणि नसतील चुकले तर खरंखोटं होईल. राज्यात कितीतरी असे अधिकारी नेते आहेत जे खाजगी गाड्यांवर दिवे लावतात, त्यांचाही तपास व्हायला हवा. हा लोकल विषय आहे की, राजकीय द्वेषाचा विषय आहे, यावर विचार करायची गरज आहे,” असेही त्या म्हणाल्या.