पूजा खेडकरांची ऑडी पोलिसांनी घेतली ताब्यात; तपासासाठी विशेष समिती गठीत

पुणे  : पुणे वाहतूक पोलिसांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी जप्त केली आहे. पुण्यात तिच्या पोस्टिंगदरम्यान, बेकायदेशीरपणे लाल-निळे दिवे लावलेल्या त्याच वाहनात फिरल्यामुळे पूजा प्रसिद्धीच्या झोतात आली. वाहनाची प्लेट व्हीआयपी क्रमांकाची होती, असा क्रमांक खासगी गाडीवर लावणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. याशिवाय पूजाने कोणतीही परवानगी न घेता तिच्या कारवर महाराष्ट्र सरकार लिहिले होते.

ऑडी कारची नोंदणी खासगी कंपनीच्या नावावर आहे. पुणे आरटीओने वाहन मालकाला नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये, कंपनीला कागदपत्र पडताळणीसाठी आरटीओसमोर त्वरित ऑडी सादर करण्यास सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबीयांचा चालक शनिवारी पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनच्या वाहतूक विभागात आला आणि त्याने गाडीच्या चाव्या दिल्या. गाडीच्या वरून लाल-निळे दिवे आणि महाराष्ट्र सरकारचा स्टिकर काढण्यात आले आहे. सध्या पोलीस गाडीची कागदपत्रे तपासत आहेत. वाहनावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 21 प्रकरणात 26 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची घटना समोर आली आहे.

34 वर्षीय प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर तिच्या मागण्यांमुळे सतत सोशल मीडियावर असते. महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी खेडकर यांच्यावर विशेष सुविधांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी विशेष कार्यालय आणि अधिकृत वाहन व कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. या सर्व सुविधा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिल्या जात नाहीत.

यूपीएससीमध्ये चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोपही खेडकर यांच्यावर होत आहे. दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पूजाला नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र मिळाले आहे, तर तिच्या कुटुंबाचे घोषित उत्पन्न 60 कोटी रुपये आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे पूजाची वाशिम येथे बदली करण्यात आली.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती पूजाच्या यूपीएससीमधील निवडीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांचीही चौकशी करेल.