जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येतेय. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागलाय. अशातच या महागमार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी तरुणीची मृत्यूची झुंज अपयशी ठरली असून उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला.पूनम सुनील विसपुते (वय. २७, रा.आशाबाबानगर) असं मृत तरुणीचं नाव आहे.
जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथे पूनम विसपूते ही तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती.पूनम ही शहरातील एका खासगी जीममध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कामाला होती. शहरातील महामार्गालगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर खोदकाम करण्यात आलं असून, याच खोदकामाच्या ठिकाणी गेल्या मंगळवारी पूनम दुचाकीने जात असताना तिची दुचाकी घसरुन अपघात झाला होता.
या अपघातात पूनम गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, पूनम हिची घरची परिस्थिती हालाखीची असून मित्र परिवारासह इतरांकडून सोशल मीडियावर पूनम हिला उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
एकीकडे आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे पूनम हिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. शनिवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मित्रमंडळींसह परिवाराला मोठा धक्का बसलाय. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करत आहे.