---Advertisement---
शहादा : जुना खेतिया रस्त्यावरील मिशन बंगला, मलोनी ते लोणखेडा चौफुली दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज शुक्रवारी ( ११ जुलै) रोजी शहादा येथे सर्वपक्षीय जनआंदोलन पुकारण्यात आले. शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात सुमारे चार किलोमीटरची पदयात्रा काढली.
शहादा शहरातील पालिकेजवळील पाण्याच्या टाकीपासून निघालेली ही पदयात्रा खाचखळग्यांनी भरलेला रस्ता तुडवत विविध घोषणा देत लोणखेडा चौफुलीपर्यंत पोहोचली. या पदयात्रेत मिशन बंगला आणि मलोनी परिसरातील विविध वसाहतींमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, एका महिलेच्या हस्ते रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करण्यात आली. लोणखेडा चौफुलीवर सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त आंदोलकांनी विसरवाडी-सेंधवा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडत रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती आणि रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर तहसीलदार दीपक गिरासे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी. जी. वळवी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानुसार, लोणखेडा चाररस्ता, मलोनी ते मिशन बंगला रस्त्याचे काम MSIDC मार्फत तात्काळ दुरुस्त केले जाईल आणि पावसाळ्यानंतर रस्त्याचे नवीन काम हाती घेण्यात येईल. या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.
या आंदोलनात शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजीत पाटील, उबाठा गटाचे नंदुरबार जिल्हा शिवसेनाप्रमुख अरुण चौधरी, माजी उपनगराध्यक्ष जहीरभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष एन.डी.पाटील, शांतीलाल साडी, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, युवा शहर प्रमुख सागर चौधरी, मनलेश जयस्वाल, रवींद्र जमादार, जितेंद्र जमदाडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल कुवर, लोटन धोबी, विनोद चौधरी, कॉ. ईश्वर पाटील, सामाजिक कार्यकर्ते यशवंत चौधरी, माजी नगरसेवक रियाज कुरेशी, संतोष वाल्हे, लोणखेडा येथील गणेश राजे, प्रवीण भावसार, अजित बाफना यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मुस्लिम व आदिवासी समाजाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे विष्णू जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले.