---Advertisement---
---Advertisement---
शहादा : तालुक्यातील मोहिदा,सोनवद, कहाटूळ आणि जयनगर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून या परिसरात बिटुमिनस व काँक्रीट रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालयाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रा. मकरंद पाटील यांनी हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कॅबिनेट मंत्री ना.जयकुमार गोरे यांना दिले आहे. या निवेदनांत नमूद केले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा, सोनवद, कहाटूळ आणि जयनगर या गावांना शहाद्याशी जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
मागील पाच वर्षांहून अधिक काळापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना विशेषतः या गावातील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, सीएमजीएसवाय आणि पीएमजीएसवाय यांसारख्या संबंधित स्थानिक संस्थांनी या महत्त्वाच्या रस्त्याची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. योग्य देखभालीच्या अभावामुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांची सुरक्षितता प्रभावित झाली आहे.
ही गावे प्रा. पाटील यांच्या मतदारसंघात येतात. या रस्त्याची दुरावस्था पाहता ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करून त्वरित दुरुस्त करण्याची त्यांच्याकडे मागणी केली आहे. विशेषतः शाळकरी मुलांना दैनंदिन प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना प्राधान्याने सात मीटर रुंदीच्या नवीन दोनपदरी रस्त्याचे बांधकाम मंजूर करण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात यावेत. या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना होऊन दुर्दैवी घटना घडू शकते. या अपघातात जीवित हानी झाली तर संबंधित विभाग व अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा खटला दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.