सकारात्मक दृष्टिकोनाची गरज कोटा

by team

---Advertisement---

 

कोटा: राजस्थान हे नाव आता वेगळ्या गोष्टीसाठी समोर येऊ लागले आहे. एकाच दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी या कोटा येथे कतीच आत्महत्या केल्याची घटना घडली. हे विद्यार्थी नीट या वैद्यकीय परीक्षेचा अभ्यास करीत होते. मागील काही वर्षांचा जर मागोवा घेतला तर असे लक्षात येईल की, शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी कोटा येथे परीक्षेचा ताण असह्य होऊन आत्महत्या केलेली आहे. ज्या बालकांच्या जन्मानंतर त्यांच्या पालकांना आपण आई-वडील बनलो म्हणून खूप आनंद झाला असेल.

मुलाचा जन्म हे ज्यांनी यश समजले असेल, त्याच पालकांच्या कपाळावर यांनी आत्महत्या केल्यानंतर कायमस्वरूपी अपयशी अशा पद्धतीचा शिक्का मारला गेला आहे. विविध पद्धतीच्या परीक्षांना व्यक्तीला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे परीक्षा आणि त्यातील यश-अपयश हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, हे सत्य या विद्यार्थ्यांनी स्वीकारलेले दिसत नाही. बरेचदा आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये मुलांबाबतीत काही स्वप्न असतात. आपल्या जीवनामध्ये ज्या आशा-आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत, जे स्थान त्यांना गाठता आले नाही ते स्थान कमीत कमी आपल्या मुलांनी तरी गाठावे, अशी त्यांची इच्छा असते. पूर्वी एवढी जीवघेणी स्पर्धा नव्हती.कमी गुण मिळणे हा अपराध नव्हता.

आता तीव‘ स्पर्धा आहे. कोणाला किती पॅकेज मिळाले याची चर्चा आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेतील अपयश म्हणजे जीवनातील अपयश आहे. अशा पद्धतीचा भाव निर्माण होत असावा. जुन्या काळातील एक विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत तृतीय श्रेणी मिळाली. बारावीच्या परीक्षेतसुद्धा त्यांना तृतीय श्रेणी मिळाली. त्यामुळे ते विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकला नाही. त्यांचा हिरमोड झाला. त्यांचे सर्व मित्र विज्ञान शाखेत गेले. डॉक्टर झाले. अभियंता झाले. यांना मात्र बी.ए. करावे लागले. त्यानंतर यांनी कायदा विषयाचे शिक्षण घेतले व एके दिवशी न्यायमूर्तीची परीक्षा पास होत हेच विद्यार्थी न्यायाधीश झाले. पुढे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. ते म्हणाले जर विज्ञान शाखेमध्ये मला प्रवेश मिळाला असता तर मी अभियंता झालो असतो. परंतु आज अनेक अभियंते, डॉक्टर, सरकारी अधिकारी माझ्यासमोर मान वाकवून उभे असतात हे झाले नसते. ज्याला मी अपयश समजलो होतो ते अपयश नव्हते.

तो मार्ग माझा नव्हता. माझ्यासाठी काहीतरी लिहून ठेवलेले होते ते मला मिळाले.एपीजे अब्दुल कलाम हे  वैमानिक होण्याची परीक्षा देण्यासाठी गेले होते. त्यामध्ये ते अपयशी ठरले. त्यांच्या मनात खूप निराशा निर्माण झाली. गंगेच्या किनार्‍यावर फिरत असताना त्यांना तिथे एक आश्रम दिसला. सहज म्हणून ते त्या आश्रमात गेले. आश्रमाचे दार ढकलले. समोर एक स्वामी महाराज बसलेले होते. त्यांनी डोळे उघडले व यांच्याकडे पाहात ते म्हणाले, जो दरवाजा तुझ्यासाठी उघडा असेल तो दरवाजा ठोठव. तो उघडेल. आणि त्यानंतर एपीजे कलाम यांनी अंतराळ संशोधन या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली. त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. काही दिवसांपूर्वी माझी एका राष्ट्रीय स्तराच्या प्रशिक्षकाशी भेट झाली.

त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. इंग‘जीवर प्रभुत्व होते. परंतु त्याने मला सांगितले की, मी दहावी नापास झालो होतो. त्यांचे हे शब्द ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. काहींना अभ्यास करण्यात रुची नसते. म्हणून ते अभ्यास करीत नाही तर काहींना अभ्यास करणे हे आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे, हे समजलेले नसते. काहींना ही समज चौथीमध्ये येते, काहींना सातवीमध्ये तर काहींना दहावीत येते. काहींना कॉलेज जीवनात येते. प्रश्न साक्षात्काराचा आहे. ज्यावेळेस हा साक्षात्कार व्यक्तीला होतो त्यावेळेस तो स्वयंस्फूर्तीने अभ्यास करू लागतो. प्रयत्न करू लागतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---