‘आता घरातही मुली सुरक्षित नाहीत’, पोटच्या मुलीवर बापानेच केला अत्याचार; अखेर पत्नीनेच…

धुळे : राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र शाळाच काय आता मुली, तरूणी त्यांच्या घरातही सुरक्षित नसल्याचे काही घटनावरून समोर येत आहेत.

एका नराधम पित्याने त्याच्या पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे शहरात हा प्रकार घडला असून, अखेर त्याच्या पत्नीनेच या अत्याचाराला वाचा फोडत पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघ्या सहा वर्षाची असून ती आई-वडिलांसोबत धुळे शहरात राहते. ही घटना १० रोजी मध्यरात्री व २२ रोजी बाराच्या सुमारास घडली. नराधम पित्याने त्याच्याच सहा वर्षाच्या मुलीशी अंगलट करीत लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडित मुलगी अतिशय भेदरली. अखेर तिने हिंमत करून तिच्या आईला सर्व प्रकार सांगितला.

आपल्याच पतीने, पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजताच पीडित मुलीच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला. मात्र त्यानंतर तिने या अत्याचाराला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला.

पीडित मुलीच्या आईने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पतीचे सर्व कृत्य पोलिसांसमोर कथन करत आरोपी पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार नराधम पित्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.