वीज वितरण विभागाची ५१ वीज चोर ग्राहकांवर कारवाई

तरुण भारत लाईव्ह न्युज – अमळनेर शहर कक्षातील पाताळनगरी व मुजावर वाडा या भागात वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम राबवण्यात आली , या मोहिमेमध्ये २ रोहित्रावरील फ्यूज दररोज जात असलेल्या भागातील एकूण १५१ घरगुती वीज कनेक्शन तपासण्यात आले. यामध्ये ५१ मीटरमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात २५० असे एकूण ७६ वीज ग्राहकांचे मीटर टेस्टिंगसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मीटरमध्ये वीज चोरी आढळल्यास वीज चोरीचे देयक सदर ग्राहकांना अदा करण्यात येतील व सदर वीज बिल न भरल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येतील.

ही मोहीम कार्यकारी अभियंता धरणगाव पवार यांच्या मार्गदर्शना खाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता प्रशांत महाजन, राहुल पाटील, जयदिपसिंग पाटील, युवराज तायडे, लक्ष्मी माने व एरंडोल शहर कक्षाचे सर्व जनमित्र सहभागी झाले.

दरम्यान एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी सांगितले की, ज्या वीज ग्राहकांचे मीटर आत्ता बदलले आहे, त्या मीटरमध्ये ग्राहकांनी काही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास अशा वीज चोरी करणार्‍या ग्राहकांवर सरळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.