नवी दिल्ली : पृथ्वीच्या पोटात हायड्रोजनचा पर्वत आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, यातील थोडेसे वापरले तर, २०० वर्षे जीवाश्म इंधनाची गरज भारणार नाही. पृथ्वीच्या पोटात सुमारे ६.३ ट्रिलियन टन हायड्रोजन आहे. हे हायड्रोजन दगड आणि भूमिगत जलाशयात आहे. हे हायड्रोजन पृथ्वीवर असलेल्या तेलापेक्षा २६ पट जास्त आहे. पण, समस्या अशी आहे की, शास्त्रज्ञांना या हायड्रोजनचे नेमके स्थान माहीत नाही. जो सापडला आहे, तो एकतर समुद्रात आहे किंवा किनाऱ्यापासून खूप दूर खोल आहे. त्याचे प्रमाण जास्त नाही, त्यामुळे तिथून हायड्रोजन काढणे फायदेशीर नाही.
हायड्रोजन मोठ्या प्रमाणात आहे. हा एक स्वच्छ ऊर्जेचा सर्वांत मोठा स्रोत आहे. याचा फायदा वाहन चालवण्यासाठी होऊ शकतो. यातून वीज निर्माण होऊ शकते. एवढ्या मोठ्या हायड्रोजन साठ्यापैकी फक्त २ टक्के म्हणजे १२४ कोटी टन संपूर्ण जगाला निव्वळ शून्य उत्सर्जनापर्यंत नेऊ शकतो. ही वीज २०० वर्षे पृथ्वीला पुरते. प्रदूषणातून पृथ्वीची सुटका होण्यास मदत होऊ शकते.
हायड्रोजनची समान मात्रा जीवाश्म इंधनाच्या दुप्पट ऊर्जा निर्माण करते. सारा आणि जेफ्री यांचा अभ्यास नुकताच सायन्स ॲडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हायड्रोजनचे प्रमाण शोधण्यासाठी दोन्ही शास्त्रज्ञांनी पृथ्वीतून बाहेर पडणाऱ्या हायड्रोजनचे मॉडेल तयार केले, तेव्हा हे लक्षात आल्याचे भूगर्भशास्त्रज्ञ सारा गेल्मन यांनी सांगितले.
दगडांमधील रासायनिक अभिक्रियामुळे हायड्रोजन तयार होतो. जेव्हा पाण्याचे दोन भाग होतात, तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडला जातो. निसर्गात अनेक प्रक्रिया होत आहेत; मात्र हायड्रोजन तयार होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.