तळोदा : शहादा येथे १ एप्रिल ते ५ एप्रिलदरम्यान प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा येथे पत्रकार परिषद घेतली.
प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनाचा लाभ तळोदा आणि परिसरातील नागरिकांना व्हावा, यासाठी ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान तळोद्यात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा दत्त मंदिरापासून सुरू होऊन बिरसा मुंडा चौकापर्यंत जाईल, अशी माहिती आमदार पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच त्यांनी तळोदावासियांना या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
शहादा येथे होणाऱ्या कथेचा लाभ घेऊन जीवनाचे कल्याण करावे, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजप शहराध्यक्ष गौरव आणि जितेंद्र सूर्यवंशी, जगदीश परदेशी, संजय वाणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.