आमदार सुरेश धस यांनी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.
प्राजक्ता माळी यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, राज्य महिला आयोगाने त्वरित कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले की, प्राजक्ता माळीच्या तक्रारीनुसार मुंबई पोलिस आणि बीड पोलिसांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
‘महिला आयोगाच्या वकील आणि तज्ज्ञांनी शहानिशा केल्यानंतर आज दुपारी अर्ज मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाला पाठवला आहे,’ असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
याशिवाय, सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून अश्लिल वक्तव्यांची चाचपणी करून संबंधित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “आजकाल महिलांचे चारित्र्य हनन होणे हे एक मोठे संकट बनले आहे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महिलांना तक्रार करण्यास घाबरणे हा एक मोठा अडथळा आहे. यासाठी आम्ही उपाययोजना करत असून, या बाबींबद्दल पोलिसांनाही सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.”
राज्य महिला आयोगाने प्राजक्ता माळीच्या तक्रारीला गंभीरतेने घेतले असून, या घटनेची चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.