भाजपाच्या गटनेतेपदी प्रकाश बालाणी उपगटनेतेपदी नितीन बरडे, प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड

---Advertisement---

 

भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेच्या गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर नाशिक येथे भाजपाच्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.

महापालिका निवडणुकीत भाजपा महायुतीने सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे 46 नगरसेवक निवडून आले असून महापालिकेत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या गटनेते पदाच्या निवडीची धावपळ आता सुरू झाली आहे. गुरूवारी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपाचा गटनेता ठरला नाशिकमध्ये

गटनोंदणीसाठी भाजपाचे सर्व नगरसेवक बुधवारी नाशिकला रवाना झाले होते. याठिकाणी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत प्रकाश बालाणी यांच्या नावावर एकमत झाल्याने महापालिकेच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली. तसेच उपगटनेतेपदी महापालिकेतील अनुभवी असलेले नगरसेवक नितीन बरडे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांना संधी

महापालिकेत दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपाचे प्रभाग 9 चे नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. युवा नगरसेवकाला प्रतोपदासारखी मोठी जबाबदारी देऊन भाजपाने धक्कातंत्राचा वापर केला आहे.

प्रतोद म्हणजे काय?

पक्षप्रतोद म्हणजे पक्षप्रमुख, जो पक्षाने ठरवलेल्या शिस्त आणि डावपेचाबर हुकूम चालतो व आपल्या पक्षाच्या सभासदांवर लक्ष ठेवून असतो. महत्वाच्या मुद्द्यांवर मतदान होणार असेल तर तो व्हीप बजावतो. व्हीप म्हणजे सभासदांनी सभागृहात हजर राहण्याची आणि एखाद्या मुद्द्याच्या बाजूने किंवा विरुद्ध मतदान करण्याची आज्ञा.

गटनेता म्हणजे काय?

गटनेता म्हणजे आपल्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करणारा नेता. त्यांची निवड पक्षाच्या सदस्यांमार्फत केली जाते. गटनेता हा पक्षाच्या धोरणांनुसार सभागृहात भूमिका मांडतो. तो आपल्या पक्षाच्या सदस्यांमध्ये समन्वय साधतो. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतो आणि निर्णय घेतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---