जळगाव : उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेचे लढाऊ नेत्या म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रतिभा शिंदे यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
प्रतिभा शिंदे यांनी लोकसभा निवडणुकांअगोदरच दिल्ली येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राहुल गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांमध्ये त्या राहुल गांधी यांच्यासोबत सक्रिय सहभागी होत्या. त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी खान्देश मधील प्रामुख्याने नंदुरबार येथील निवडणुकीची प्रचार धुरा सांभाळत रावेर, जळगाव व धुळे मतदारसंघामध्ये ही महाविकास आघाडीचा प्रचार यशस्वीपणे करत धुळे व नंदुरबार येथील उमेदवारांच्या विजयात महत्वपुर्ण कामगिरी बजावली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची ऑल इंडिया काँग्रेस कमेटीकडे शिफारस केल्यानुसार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी यांनी त्यास मंजुरी देत काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसे पत्र त्यांना दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभा शिंदे यांना हे पद मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळाले असून सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.